सार
अर्थमंत्रालयात बुधवारी (25 जानेवारी) संध्याकाळी हलवा समारंभ पार पडला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हलवा समारंभावेळी अर्थमंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचे तोंड गोड केले.
Halwa Ceremony : भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाकडून अंतरिम अर्थसंकल्प 2024 तयार करण्यात आला आहे. बुधवारी (25 जानेवारी) संध्याकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ पार पडला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्रालयांतील अधिकाऱ्यांचे तोंड गेले. हलवा सोहळ्यासाठी निर्मला सीतारमण यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड देखील उपस्थितीत होते.
अर्थसंकल्पाच्या 'लॉक-इन' प्रक्रियेला सुरुवात
अर्थसंकल्पासाठी 'लॉक-इन' प्रक्रिया सुरू होण्याआधी प्रत्येक वर्षी हलवा समारंभ पार पाडला जातो. अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्याबद्दलची गुप्तता राखण्यासाठी आणि संसेदत सादर होण्यापूर्वी लीक होऊ नये म्हणून 'लॉक-इन' प्रक्रिया पार पाडली जाते. हलवा समारंभावेळी अर्थसंकल्पाशीसंबंधित व्यक्तींना हलवा दिला जातो. यानंतर संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अधिकाऱ्यांना अर्थ मंत्रालयात राहावे लागते.
हलवा समारंभ का पार पाडला जातो?
गेल्या अनेक दशकांपासून अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ पार पाडला जातो. खरंतर हलवा समारंभ सादर करण्यामागील कारण असे की, कोणतेही खास किंवा मोठे काम सुरू करण्याआधी तोंड गोड करण्याची भारतात परंपरा आहे. याशिवाय हलवा समारंभ एक प्रकारे अर्थसंकल्प तयार करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याची एक पद्धत आहे.
येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी फार महत्त्वाचा आहे. अशातच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्व क्षेत्रांसाठी काय घोषणा केल्या जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा :
Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता