सार
चौकशीत सहकार्य करणार असल्याचे गुगल मॅप्सने कळवले.
दिल्ली: बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून कार नदीत पडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुगल मॅप्सविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुगल मॅप्सचा वापर करून युवक प्रवास करत होते, असे पोलिसांनी सांगितले. गुगल मॅप्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे.
"कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. चौकशीत सहकार्य करू आणि पूर्ण पाठिंबा देऊ," असे गुगलचे प्रवक्त्याने एएफपीला सांगितले.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात रामगंगा नदीत कार पडली. लग्नाला जात असलेल्या युवकांचा या अपघातात मृत्यू झाला. फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
फरुखाबादमधील तीन युवक शनिवारी रात्री बदायूंमधील दातागंजहून फरीदपूरला कारने जात होते. रामगंगा नदीवरील पुलावरून जाताना कार नदीत पडली. पुरात कोसळलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट होते. एका बाजूला जोडरस्ता बांधलेला नव्हता. सुमारे ५० फूट खाली कार पडली. अमित कुमार, त्याचा भाऊ विवेक कुमार आणि मित्र कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.
अपूर्ण पूल बंद केला असता तर हा अपघात झाला नसता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शनिवारी रात्री झालेला अपघात कोणालाही कळला नाही. रविवारी सकाळीच स्थानिकांना अपघाताची माहिती मिळाली.