दिल्लीच्या 'दिल्ली हाट'मध्ये परदेशी पर्यटकांसाठी जास्त एन्ट्री फी का आकारली जाते, असा प्रश्न एका परदेशी पर्यटकाने विचारला आहे. 'भारतात वंशभेद?' असं म्हणत त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

एका परदेशी पर्यटकाने दिल्लीच्या प्रसिद्ध 'दिल्ली हाट'मधील तिकीट दरांवरून एक व्हिडिओ बनवला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. परदेशी पर्यटकांकडून जास्त तिकीट का घेतलं जातं, असा सवाल या पर्यटकाने केला आहे. त्याने याची तुलना थेट युकेमधील वंशभेदाशी केली आहे. या व्हिडिओनंतर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या देशांमध्ये पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वेगवेगळ्या दरांवरून चर्चा सुरू केली आहे.

दिल्ली हाटमधील वेगळ्या तिकीट दरांवर पर्यटकाचा सवाल

टायलर ब्लंडन नावाच्या या परदेशी पर्यटकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो दिल्ली हाटच्या बाहेर असलेल्या तिकीट दरांच्या बोर्डकडे बोट दाखवताना दिसतो. या बोर्डवर भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी वेगवेगळे दर लिहिलेले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बोर्डनुसार, प्रौढांसाठी ३० रुपये आणि ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी २० रुपये प्रवेश शुल्क आहे. तर परदेशी पर्यटकांसाठी हेच शुल्क १०० रुपये आहे.

तिकिटाच्या दरातील या फरकावर प्रश्न विचारत ब्लंडन म्हणतो:

“हे बघा मित्रांनो. मला इतरांपेक्षा वेगळी किंमत मोजावी लागत आहे. जर असं युकेमध्ये केलं असतं, तर त्याला वंशभेद म्हटलं गेलं असतं. पण इथे हे चालतं.”

या व्हिडिओवर त्याने “Racism in India?” (भारतात वंशभेद?) असं टेक्स्टही लिहिलं आहे.

View post on Instagram

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी या पर्यटकाला चांगलंच सुनावलं आहे, तर काहींनी वेगवेगळ्या देशांमधील नियमांची आठवण करून दिली आहे.

एका युजरने कमेंट केली: “पहिल्यांदा त्यांनी आपल्याला लुटलं, आता आपली वेळ आहे.”

दुसऱ्या युजरने लिहिले: “युके, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आधीच ४-५ पट जास्त शिक्षण शुल्क भरावं लागतं.”

तिसऱ्या युजरने म्हटले: “तुमच्यासाठी १ युरोपेक्षा कमी पैसे देणं जर वंशभेद वाटत असेल, तर मग तुम्ही तुमच्या देशात येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकडून तिप्पट फी का घेता? भारतीयांचं उत्पन्न युरोपियन लोकांपेक्षा खूप कमी आहे, हे गणित तुम्हाला कळेल अशी आशा आहे.”

चौथ्या युजरने कमेंट केली: “भारतीय विद्यार्थी पाश्चात्य देशांमध्ये तिप्पट फी भरतात आणि तरीही त्यांच्यावर हल्ले होतात.”

या चर्चेमुळे परदेशी पर्यटकांसाठी असलेल्या वेगळ्या प्रवेश शुल्काचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच, अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना जास्त शिक्षण शुल्क भरावं लागतं, याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं आहे.