पूर्व दिल्लीतील एका शाळेत ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा वर्गातच अचानक कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेने तिला तातडीने रुग्णालयात नेल्याचा दावा केला असला तरी, कुटुंबाने प्रथमोपचार मिळण्यास उशीर झाल्याचा आरोप केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पूर्व दिल्लीच्या मयूर विहार फेज २ मधील लव्हली हेरिटेज स्कूलमध्ये एका ९ वर्षांच्या चिमुकलीचा वर्गातच अचानक कोसळून मृत्यू झाला. ती इयत्ता तिसरीत शिकत होती. वेळेवर प्रथमोपचार आणि सीपीआर (CPR) न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, यानंतर शाळेच्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, शाळेच्या प्रशासनाने मात्र वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) असल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, खेळाच्या तासानंतर ती मुलगी वर्गात येते आणि अचानक खाली कोसळते. पडण्यापूर्वी ती थकल्यासारखी स्वतःच्या कमरेवर हात ठेवताना दिसते. व्हिडिओमध्ये वर्गशिक्षिका लगेच तिच्याकडे धावत जाताना आणि तिला उचलून खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण ती मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते.
त्यानंतर शिक्षिका वर्गाबाहेर जातात आणि काही सेकंदातच परत येऊन मुलीला वैद्यकीय मदतीसाठी उचलून बाहेर घेऊन जातात.
या घटनेपूर्वीच्या दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी इतर मुलांसोबत पायऱ्या चढताना दिसत आहे. तसेच शाळेच्या मैदानावरील एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ती इतर मुलांसोबत उभी असल्याचेही दिसते.
मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला निर्माण विहार येथील मलिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
व्हिडिओ पाहा
मुलीचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
या दुर्दैवी घटनेमुळे दिल्लीतील शाळांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीला तोंड देण्याच्या तयारीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.




