मुलगा फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास ऐवजी 3AC मध्ये प्रवास करावा लागल्याने कुरकूर करत होता, त्यानंतर वडिलांनी त्याला थेट जनरल डबा दाखवून वास्तवाची जाणीव करून दिली.

मुलांना उत्तम शिक्षण आणि सुविधा देण्यासोबतच त्यांना वास्तवाची जाणीव आणि सहानुभूती शिकवणं ही पालकांची मोठी जबाबदारी असते. प्रवासाच्या सुविधांवरून तक्रार करणाऱ्या मुलाला एका बापाने आयुष्याचा मोठा धडा दिला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या वडिलांच्या आदर्श 'पॅरेंटिंग'चं लोक खूप कौतुक करत आहेत.

तक्रारीतून सुरू झालेला प्रवास

अधिक सोयीस्कर अशा फर्स्ट किंवा सेकंड क्लास ऐवजी 3AC मधून प्रवास करावा लागल्याने मुलाची चिडचिड सुरू होती. वडिलांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, दिवाळीच्या प्रवासासाठी तातडीने तिकीट बुक करावं लागल्याने कुटुंबाला 3AC चं तिकीट मिळालं होतं. नेहमी वरच्या क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या मुलाला जनरल डब्यातील प्रवाशांची परिस्थिती प्रत्यक्ष दाखवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला.

"माझ्या मुलाला आयुष्याची दुसरी बाजू दाखवण्यासाठी मी त्याला जनरल डब्यात घेऊन गेलो. मला त्याला जे दाखवायचं होतं, ते त्याने अगदी लक्ष देऊन पाहिलं," अशा कॅप्शनसह वडिलांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा लहानगा खच्चून भरलेल्या जनरल डब्यातून चालताना दिसत आहे. प्रवासी सीटवर, जमिनीवर आणि डब्याच्या पॅसेजमध्ये बसलेले-झोपलेले व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

View post on Instagram
 

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

प्रत्यक्ष अनुभवातून मुलाला सहानुभूती आणि नम्रता शिकवण्याच्या या वडिलांच्या पद्धतीला इंटरनेटवर मोठी पसंती मिळत आहे. व्हिडिओखाली लोक वडिलांचं तोंडभरून कौतुक करत आहेत. "हे उत्तम पॅरेंटिंगचं सर्वोत्तम उदाहरण आहे. गरजा आणि सोयी-सुविधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत," असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्याने म्हटलं की, “आजच्या काळात असं पॅरेंटिंग दुर्मिळ आहे, तुमचं खूप कौतुक.”