Divorce Case : अरट्टाई ॲपच्या श्रीधर वेम्बूंना धक्का, पत्नीला देणार १५ हजार कोटी
Divorce Case : अरट्टाई ॲप सुरू करणाऱ्या श्रीधर वेम्बूंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे ३० वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून अरट्टाई ॲप उपलब्ध केले.

झोहो संस्थापकाच्या वैवाहिक जीवनात फूट
झोहोचे संस्थापक आणि अरट्टाई ॲप भारतात लोकप्रिय करणारे श्रीधर वेम्बू यांचे वैवाहिक जीवन घटस्फोटाने संपुष्टात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात आता महत्त्वाचा आदेश आला आहे. घटस्फोट देताना कोर्टाने पत्नी प्रमिला श्रीनिवासन यांना तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा बॉण्ड देण्याचे निर्देश श्रीधर वेम्बू यांना दिले आहेत.
१५,२७८ कोटी रुपयांचा बॉण्ड
श्रीधर वेम्बू यांनी सुरू केलेल्या कंपनी आणि मालमत्तेचे एकूण मूल्य ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यातील अर्धी रक्कम म्हणजेच १५,२७८ कोटी रुपये बॉण्डच्या स्वरूपात पत्नीला देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असे इंडिया टुडेने म्हटले आहे.
स्वदेशी, आत्मनिर्भर भारताला बळ देणाऱ्या वेम्बूंचे कौटुंबिक प्रश्न
यशस्वी उद्योजक आणि टेक संस्थापकाचे वैवाहिक जीवन अडचणीत आले आहे. २०२१ मध्येच श्रीधर वेम्बू आणि प्रमिला श्रीनिवासन यांनी घटस्फोटासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया कोर्टात धाव घेतली होती. तब्बल चार वर्षांच्या सुनावणीनंतर आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात पोहोचले असून, बॉण्ड देण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉण्ड प्रकरणी वेम्बू कोर्टात
व्हॉट्सॲपला स्पर्धक म्हणून भारतीय ॲप 'अरट्टाई' सुरू करून श्रीधर वेम्बू यांनी भारतात नवी लाट निर्माण केली होती. याआधी त्यांनी सुरू केलेल्या झोहोने गूगल, जीमेल, क्लाउडसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. कोर्टाच्या बॉण्डच्या सूचनेनंतर श्रीधर वेम्बू यांनी कोर्टात धाव घेऊन आदेशाला स्थगिती मिळवली आहे, असे ओप इंडियाने म्हटले आहे.
१९९३ मध्ये प्रमिला यांच्याशी विवाह
मद्रासमधील शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या श्रीधर वेम्बू यांनी १९९३ मध्ये प्रमिला श्रीनिवासन यांच्याशी लग्न केले. प्रमिला या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या आहेत. त्या शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. जवळपास ३० वर्षे त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये एकत्र संसार केला. २०१९ मध्ये श्रीधर वेम्बू भारतात परतले, तर प्रमिला अमेरिकेतच राहिल्या.
१९९६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनीची सुरुवात
१९९६ मध्ये श्रीधर वेम्बू यांनी दोन भाऊ आणि एका मित्रासोबत मिळून सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी सुरू केली. २००९ मध्ये तिचे नाव बदलून 'झोहो' ठेवण्यात आले. झोहो आज जगातील एक मोठी कंपनी बनली आहे. अलीकडेच त्यांनी 'अरट्टाई' नावाचे ॲप सुरू करून मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
घटस्फोटाचे कारण काय?
रिपोर्ट्सनुसार, झोहो कंपनी जगातील एक मोठी कंपनी बनली आहे. यावर वर्चस्व मिळवण्याची इच्छा पत्नी प्रमिला श्रीनिवासन यांना होती. कंपनीचा मोठा हिस्सा आपल्याला मिळावा, यावरून वाद सुरू झाला. दरम्यान, श्रीधर वेम्बू यांनी प्रमिला यांच्या नकळत कंपनीचे शेअर्स हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. मालमत्ता आणि भागीदारीवरून सुरू झालेला हा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला.

