Dharmendra Pradhan Meeting with Amit Shah : संसदेवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर आता ते राजीनामा देणार का? याबाबत एकच चर्चा आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी रस्त्यावर उतरली आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीकडून सातत्याने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी होत आहे. आज २० जुलै रोजी सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्ते, जमाव संसद भवनाजवळ पोहोचला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गदारोळ, गोंधळ झाला. पोलिसांकडून मोठ्या संख्येने आलेल्या जमावावर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं समोर आलं आहे.

धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते आता राजीनामा देणार का? अशी चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत सरकार किंवा कोणत्याही नेत्याकडून माहिती देण्यात आलेली नाही.

संसदेवर मोर्चा जाण्याआधीच पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. आंदोलनकांकडून हे बॅकिकेट्स तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांना आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी बलाचा वापर केला. लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या वापरण्यात आल्या. तसंच अनेक मेट्रो मार्ग बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान, मागील जवळपास महिनाभर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीतील जंतरमंतर इथे आंदोलन करत होते. सामाजिक कार्येकर्ते सोनम वांगचुक २८ जूनपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या उपोषणाच्या २१व्या दिवशी त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना सफदरजंग रुग्णालयातील ८व्या मजल्यावर ठेवण्यात आलं होतं. संसदेवर मोर्चा जाण्याच्या केवळ दोन दिवस आधी सोनम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी सोनम यांच्या पत्नी गितांजली यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.