एका तरुणाने 'रेडिट'वर लग्नाचा हटके प्रस्ताव मांडला आहे. त्याला अशी पत्नी हवी आहे जिचे वर्षाचे पॅकेज किमान १२ लाख रुपये असावे.
मुंबई : एका भारतीय तरुणाने रेडिटवर मांडलेल्या लग्नाच्या प्रस्तावामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणाला पूर्ण वेळ घर सांभाळायचे आहे (हाऊस हसबंड व्हायचे आहे) आणि त्यासाठी त्याला किमान १२ लाख रुपये वार्षिक पगार असलेली पत्नी हवी आहे. तसेच, लग्नानंतर त्याला मुले नको आहेत, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
त्याने आपला हा प्रस्ताव 'r/AskIndianWoman' या कम्युनिटीमध्ये 'कुटुंब चालवणारी पत्नी हवी आहे' या शीर्षकाखाली शेअर केला. त्याने लिहिले: "मी अशा भारतीय तरुणीच्या शोधात आहे, जिच्याकडे स्वतःची नोकरी, करिअर किंवा बिझनेस असेल. ती कुठेही काम करू शकते. मी घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी घेईन. मला पूर्ण वेळ घर सांभाळायचे आहे."
ही व्हायरल पोस्ट इथे पाहा:
त्याने म्हटले आहे की, "स्वयंपाक करणे, साफसफाई, कपडे धुणे आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या" पार पाडण्यात त्याला आनंद मिळेल. त्याच्या मते, पत्नीने पैसे कमवावेत आणि कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकावा.
मुलांबाबत तो अत्यंत स्पष्ट आहे. "मला मुले नको आहेत. मी या व्यवस्थेबाबत अत्यंत गंभीर आहे आणि मला प्रेमाने, आदराने आणि समानतेने संसार थाटायचा आहे," असे त्याने लिहिले. त्याला अशी पत्नी हवी आहे, जिचे पॅकेज "किमान १२ लाख रुपये (12 LPA)" असावे.
या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पारंपरिकरीत्या महिलांकडे असणारी कामे करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्याचे कौतुक केले. एकाने कमेंट केली, "पारंपरिकरीत्या महिला जी कामे करतात ती कामे पुरुष उघडपणे स्वीकारत आहेत, ही चांगली गोष्ट आहे."
तर दुसरीकडे, ही खरंच समानता आहे का? असा प्रश्न काहींनी विचारला. जर पत्नीला लग्नानंतर घर बदलायचे नसेल, तर तो पत्नीच्या घरी राहायला जाणार का? असा प्रश्न एकाने विचारला. तसेच सण-उत्सव आणि नातेवाईकांकडे गेल्यावरही तो घरातील कामे सुरू ठेवेल का? असा प्रश्नही विचारण्यात आला.
एका महिलेने विचारले की, केवळ घरातील कामे करण्याव्यतिरिक्त त्याचे दुसरे योगदान काय असेल? कारण अनेक नोकरी करणाऱ्या महिला घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात. यावर त्या तरुणाने उत्तर दिले की, त्याला भाडे आणि व्याजाच्या माध्यमातून 'पॅसिव्ह इन्कम' मिळत आहे. त्याला कुणावरही आर्थिक ओझे व्हायचे नाही आणि काळजी घेण्यामध्ये त्याला आनंद मिळतो.
या चर्चेमुळे विवाहसंस्थेतील स्त्री-पुरुषांच्या भूमिका आणि एकमेकांशी जुळवून घेणे, यावर पुन्हा एकदा वाद-विवाद सुरू झाले आहेत. ही रेडिट पोस्ट एका युझरने केली असून, त्यातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.










