सार

राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.

 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द भाजपच्या पक्षांतर्गत निर्णयात महत्त्वाचा मानला जातो. मात्र केंद्रीय पातळीवरही फडणवीसांचे महत्व वाढत आहे. दिल्लीत झालेल्या भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या पंक्तीत मानाचं स्थान देण्यात आले. या कार्यक्रमाचा फोटो समोर आला असून त्यात फडणवीसांना पहिल्या रांगेत बसवण्यात आल्याचे दिसून येते.

भाजपा मुख्यमंत्री परिषदेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे संघटन महासचिव बीएल संतोष यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते.

 

 

देवेंद्र फडणवीस यांचा जलवा कायम

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. परंतु भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांना पुढच्या रांगेत बसवण्यात आले होते. पहिल्या रांगेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्याशेजारी देवेंद्र फडणवीसांना बसण्याचा मान देण्यात आला. गोव्याचे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही पहिल्या रांगेत अखेरच्या बाजूस बसले होते. २७ आणि २८ जुलैला भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची ही परिषद होती. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीसही हजर होते. फडणवीस यांना प्रोटोकॉल तोडून पहिल्या रांगेत स्थान दिल्याचं या फोटोवरून दिसून येते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे ठरवले होते. त्यांनी पक्षनेतृत्वाकडे सरकारबाहेर राहून पक्ष वाढवण्यासाठी काम करू, मला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती केली. मात्र दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने फडणवीसांचे महत्त्व ओळखून त्यांना सरकारमध्येच कायम राहण्याचा आदेश दिला. आता पक्षाकडून मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान देण्यात आला.

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, आदित्यनाथ यांनी दिलं प्रेजेंटेशन

शनिवारी भाजपाच्या मुख्यालयात साडे तीन तासाहून अधिक चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी नोकरी भरतीबाबत त्यांचे प्रेजेंटेशन सादर केले. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारच्या २ महत्त्वाच्या योजना आणि ग्रामसचिवालय डिजिटलायेजेशन, वन ट्रिलियन डॉलर इकोनॉमी राज्य बनवणारं प्रजेंटेशन सादर केले.

आणखी वाचा :

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले - जंगल वारसा आणि खादी ही आमची ओळख