दिल्लीतील पितपुरा येथील एका रेस्टॉरंट बारमध्ये एका कपलला भारतीय वस्र परिधान केल्याने प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई : दिल्लीतील पितमपुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना ३ ऑगस्ट रोजीची असून एका जोडप्याला सलावर सूट आणि पँट-टी-शर्ट घातल्यामुळे तुब्बता बार आणि रेस्टॉरंट मध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जोडप्याने रेस्टॉरंटकडून भारतीय संस्कृतीचा अपमान झाल्याचे म्हटले आहे.
एका सोशल मीडिया युझर्सने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “दिल्लीतील पितमपुरा येथील तुब्बता रेस्टॉरंट भारतीयांना भारतीय पोशाखात अशा प्रकारे वागवते. असे वाटते की आपण पुन्हा ब्रिटिश राजवटीच्या काळात गेलो आहोत.”
काय घडले?
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती प्रशासनाला विचारतो, “सलवार सूट आणि पँट-टी-शर्ट घालूनही मला आत का जाऊ दिले नाही?” त्यांचा आरोप आहे की, रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी भारतीय पोशाख पाहून त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना प्रवेश नाकारला.
रेस्टॉरंट मालकाचे स्पष्टीकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रेस्टॉरंटचे मालक नीरज अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “असे काही घडलेच नाही. फ्रेंडशिप डे असल्याने खूप गर्दी होती, त्याला काही वेळ थांबावे लागेल असे सांगितले गेले. त्यामुळे तो नाराज झाला. पण भारतीय पोशाखामुळे त्याला थांबवण्यात आले नाही. आम्ही भारतीय आहोत, भारतीय पोशाख आमचा अभिमान आहे आणि आम्ही सर्व भारतीय पाहुण्यांचे स्वागत करतो.”
ते पुढे म्हणाले, “हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आम्ही रेस्टॉरंटच्या बाहेर एक बोर्ड लावला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घालून येथे येऊ शकता.”
कपिल मिश्रा यांची प्रतिक्रिया
या घटनेवर कपिल मिश्रा म्हणाले, “भारतीय कपडे परिधान केल्याबद्दल थांबवण्याची घटना घडली होती, परंतु आता मालकाने माफी मागितली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय कपडे घालून येणाऱ्या महिलांना सवलत देण्याचे पोस्टर देखील लावले आहे.”


