दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.
मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलकांवरील पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची नुकतीच संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी केंद्र सरकावर जोरदार टीका करण्यात आली. यासोबत आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला.
‘देशातील तरुण चिंतेत, सरकारने त्यांचे म्हणणे ऐकावे’
अरविंद केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. यानंतर या बैठकीत देशातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषावर चर्चा झाल्याचे सांगितले. दिल्लीतील जंतरमंतरवर विविध राज्यांतील विद्यार्थी आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यंच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. देशाच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांचे म्हणणे सरकारने गांभीर्याने ऐकावे असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
पेपरफुटीवर सरकारला सवाल
नीट पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत केजरीवाल यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केले. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींविरोधात वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने त्यांना जामीन मिळाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. तसेच केजरीवाल यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी ठामपणे उभे राहावे' - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनाला विरोधी पक्षांचा व्यापक पाठिंबा मिळावा, अशी भूमिका मांडली. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही म्हटले. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
आंदोलनाचे स्वरूप बदलण्याची वेळ आली
सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. आता आंदोलन अधिक व्यापक करण्याची वेळ आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. जंतरमंतरवरील आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांनी अधिक बळ द्यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.


