दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. या भेटीत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. मोदींनी भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत भेटीची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह पेपरफुटीच्या मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार, सुप्रीया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर या भेटीचे फोटो शेअर करत भेट झाल्याची माहिती दिली. या बैठकीत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, पेपरफुटी प्रकरण आणि त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन दिल्याची चर्चा
भेटीदरम्यान शरद पवार यांच्या हातात एक फाईल दिसत होती. ही फाइल जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित निवेदन असल्याची चर्चा आहे. त्यानंतर मोदी आणि पवार यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलनस्थळीही दिली होती भेट
याआधी जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती. आंदोलनकर्त्यांची विचारपूस करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली होती. विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली होती. या भेटीनंतर लगेचच पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीमुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


