सार
Chardham Yatra 2024 Kapat : चारधाम यात्रेची आजपासून (10 मे) सुरुवात झाली आहे. अशातच केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करुन देण्यात आले आहे.
Chardham Yatra 2024 : उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा खुले करण्यात आले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री केदारनाथ धामचे दरवाजे संपूर्ण विधिवत आणि वैदिक मंत्रांच्या उच्चारांसह खुले करण्यात आले आहेत. मंदिराचे दरवाजे खुले करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पत्नी गीता धामी यांच्यासोबत केदारनाथ दर्शनासाठी उपस्थितीत होते.
चारधाम यात्रेला सुरुवात
यंदाच्या चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारीच पालखी केदारनाथला पोहोचली होती. केदारनाथचे दरवाजे सकाळी 7 वाजता खुले करण्यात आले. यमुनेत्रीचे दरवाजे सकाळी 10 वाजून 29 मिनिटांनी आणि गंगोत्रीचे दरवाजे दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी खुले केले जाणार आहेत. यानुसार चारधामच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धामांपैकी आणखी एक धाम बदरीनाथचे दरवाजे 12 मे रोजी खुले करून दिले जाणार आहेत.
मंदिरावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी
केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यासाठी संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. याशिवाय हेलिकॉप्टरच्या माध्यातून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनीही उपस्थितीत लावली होती.
जेष्ठ नागरिकांना दर्शनासाठी विशेष सुविधा
केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी जय बाबा केदार! सर्व भविकांचे चारधाम यात्रा 2024 साठी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन असे म्हटले आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. प्लास्टिकचा वापर करणे टाळावे. याशिवाय सरकारकडून चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा :
Char Dham Yatra 2024 : नोंदणी न करता यात्रेला जाताय ? तर हे तुमच्यासाठी नक्की वाचा