Bharat Bandh : केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. सुमारे 30 कोटी कामगार संपात सहभागी होण्याची शक्यता असून बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहतूक सेवांवर परिणाम होऊ शकतो. 

Bharat Bandh : केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज (12 फेब्रुवारी 2026) देशव्यापी भारत बंदची (Bharat Bandh 12 Feb 2026) हाक देण्यात आली आहे. देशभरातील विविध संघटनांचे अंदाजे 30 कोटी कामगार या संपात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि काही वाहतूक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

संपामागील मुख्य कारणे काय?

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या. या नव्या संहितांविरोधात कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत देशव्यापी बंदची घोषणा केली आहे.

  • संघटनांच्या मते, नव्या कामगार संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार आहेत.
  • नोकरीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
  • वेतनातील तफावत वाढण्याची भीती आहे.

याशिवाय, खासगीकरणाचा विरोध, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि ‘पीस’ कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही संघटनांनी लावून धरली आहे.

संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या सेवांवर होऊ शकतो परिणाम?

  • भारत बंदमुळे खालील सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे:
  • सरकारी कार्यालये आणि काही बाजारपेठा
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कार्यालये
  • कारखाने आणि काही खासगी कंपन्या
  • बाजार समित्या आणि भाजी मंडई
  • केरळ, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांत अधिक परिणाम होण्याची शक्यता
  • आज दुपारी 2 वाजता देशभरात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

कोणत्या सेवा सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.
  • विमानतळे आणि विमान सेवा सुरू राहणार
  • बँका आणि विमा कंपन्यांच्या ऑनलाइन सेवा सुरू राहतील
  • रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा कार्यरत राहतील