बेंगळुरूमधील एका व्यक्तीला हॉटेलचं बिल पाहिल्यावर धक्काच बसला. कारण बिलावर त्याच्या नावाऐवजी 'छोटा, जाड, काळा शर्ट' (Little fat black shirt) असं लिहिलेलं होतं.
एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर बिलावर आपलं नाव किंवा टेबल नंबर असतो. पण बेंगळुरूमधल्या एका व्यक्तीसोबत एक अजबच प्रकार घडला. हॉटेलचं बिल हातात आल्यावर त्यावर नावासमोर जे लिहिलं होतं, ते पाहून त्याला धक्काच बसला. बिलावर त्याचं नाव लिहिण्याऐवजी 'Little fat black shirt' (छोटा, जाड, काळा शर्ट) असं लिहिलं होतं.
हा सगळा प्रकार r/Bangaloresocial या रेडिट पेजवर एका पोस्टमधून समोर आला आहे. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे. पीडित व्यक्तीने 'Subko didn’t use my name' (सबकोने माझं नाव वापरलं नाही) या नावाने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने सांगितलं की तो कोरमंगला भागातील 'सबको द क्राफ्टरी' (Subko The Craftery) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे त्याने जेवणाची ऑर्डर दिली आणि बिलही भरलं. पण नंतर जेव्हा त्याने बिलावर लक्ष दिलं, तेव्हा कस्टमरच्या तपशिलाखाली हा विचित्र उल्लेख त्याला दिसला.
बिलाचा स्क्रीनशॉट पोस्ट करत त्याने प्रश्न विचारला की, ग्राहकाला ओळखण्यासाठी त्याच्या शारीरिक वर्णनाचा वापर का केला जात आहे?
त्याने पुढे लिहिलं की, अशा प्रकारे शारीरिक वर्णनावरून ओळखणं हे खूपच अपमानास्पद आहे. ग्राहकांना त्यांच्या नावाने, टेबल नंबरने किंवा ऑर्डरच्या तपशिलावरून सहज ओळखता येतं. शिवाय, केवळ पुरुष आहे म्हणून त्याच्या बॉडी-शेमिंगकडे विनोद म्हणून दुर्लक्ष करू नये, असंही त्याने स्पष्ट केलं.
या पोस्टनंतर रेडिटवर मोठी चर्चा सुरू झाली. काही जणांनी याला विनोदाचा चुकलेला प्रयत्न म्हटलं, तर काहींनी हा ग्राहकाचा सरळसरळ अपमान असल्याचं म्हटलं.
हा वाद वाढल्यानंतर, सबको कॉफी रोस्टर्सने (Subko Coffee Roasters) इन्स्टाग्रामवर जाहीरपणे माफी मागितली. रेस्टॉरंटने तक्रारीची दखल घेतली असून, ही समस्या शांतपणे मिटवण्याऐवजी जाहीरपणे स्वीकारत असल्याचं म्हटलं.
“काही गोष्टी शांतपणे दुरुस्त केल्या जातात. तर काही गोष्टी जाहीरपणे, कारण शांत राहिल्याने अशी संस्कृती वाढत जाते,” असं रेस्टॉरंटने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
त्या ग्राहकाला उद्देशून सबकोने म्हटलं की, “हे कसं दिसलं यासाठी नाही, तर जे घडलं त्यासाठी आम्ही माफी मागतो.” रेस्टॉरंटने त्या ग्राहकाला त्यांच्या अंतर्गत तक्रार निवारण आयोगाशी (ICC) संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी इन्स्टाग्राम बायोमध्ये एक फॉर्मची लिंक दिली आहे.
रेस्टॉरंटने बॉडी-शेमिंगच्या विरोधात कठोर भूमिका घेत म्हटलं, “फॅट शेमिंग चुकीचं आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक स्वरूपात. त्याला कोणताही अपवाद नाही.”
काही युजर्सनी चूक जाहीरपणे स्वीकारल्याबद्दल आणि जबाबदारी घेतल्याबद्दल सबकोचं कौतुक केलं, तर काहींनी रेस्टॉरंटवर टीका केली. ग्राहकाच्या शरीराचा उल्लेख ओळख म्हणून कधीच केला जाऊ नये, असं मत अनेकांनी मांडलं.


