WhatsApp Scam : बंगळूरमधील एका 42 वर्षीय फर्निचर दुकानदाराला व्हॉट्सॲपवर आलेल्या लग्नाच्या बनावट पत्रिकेमुळे तब्बल 5 लाखांचा गंडा बसला. त्याने 'APK' फाईल डाउनलोड करताच हॅकर्सनी त्याच्या फोनचा ताबा घेतला आणि बँक खात्यातून पैसे काढून घेतले.
WhatsApp Scam : बंगळूरमधील एका 42 वर्षीय फर्निचर दुकानदाराला सायबर चोरांनी चांगलाच गंडा घातला आहे. व्हॉट्सॲपवर आलेली लग्नाची पत्रिका खरी समजून उघडणं या दुकानदाराला चांगलंच महागात पडलं. या एका चुकीमुळे त्याला जवळपास 5 लाख रुपये गमवावे लागले आहेत. चोरांनी त्याच्या फोनचा रिमोट ॲक्सेस मिळवून हे पैसे लंपास केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीला एका ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरून व्हॉट्सॲपवर "Wedding APK Invitation" नावाची एक फाईल आली. लग्नाची पत्रिका असेल असं समजून त्याने ती फाईल डाउनलोड केली आणि उघडली.
ही एक APK फाईल होती, ज्यात मालवेअर (एक प्रकारचा व्हायरस) होता. ही फाईल इन्स्टॉल होताच स्कॅमर्सना त्या व्यक्तीच्या मोबाईलचा पूर्ण ताबा मिळाला. यानंतर, त्याच्या नकळत त्याच्या बँक खात्यातून एकापाठोपाठ एक व्यवहार झाले. काही कळायच्या आतच खात्यातून सुमारे 5 लाख रुपये गायब झाले होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बंगळूरच्या नयनदहल्ली भागात राहणाऱ्या या व्यक्तीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C (ओळखीची चोरी) आणि 66D (कॉम्प्युटर वापरून फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा आणि पैशांचा माग काढण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.
सायबर तज्ज्ञ नेहमीच एक इशारा देतात की, व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ॲप्सवरून आलेल्या अनोळखी किंवा अनपेक्षित APK फाईल्स कधीही डाउनलोड करू नयेत. अशा फाईल्समध्ये धोकादायक मालवेअर असू शकतो, जो तुमचे पासवर्ड, बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती चोरू शकतो. या फाईल्स ॲप स्टोअरच्या सुरक्षा तपासणीतून जात नसल्याने त्या जास्त धोकादायक असतात.
गुरुग्राममध्येही अशीच घटना
गेल्या वर्षी गुरुग्राममध्येही एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला होता. त्याला व्हॉट्सॲपवर लग्नाच्या पत्रिकेची लिंक आली. कोणाचं लग्न आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने त्या लिंकवर क्लिक केलं आणि नकळतपणे हॅकर्सना आपल्या फोनचा ताबा दिला. त्याच्या लक्षात येईपर्यंत, बँक खात्यातून 97,000 रुपयांचे व्यवहार झाले होते. त्यानंतर त्याने गुरुग्राम पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.


