बंगळुरूमध्ये दिवाळी २०२६ साठी नवीन नियम लागू झाले आहेत. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान रात्री ८ ते १० या वेळेतच ग्रीन फटाके फोडता येतील. सण साजरा करण्यापूर्वी फटाक्यांवरील निर्बंध, क्यूआर कोडचे नियम आणि हेल्पलाइन नंबर नक्की तपासा.
दिवाळी जवळ आलीये, आणि कर्नाटक सरकारने प्रदूषण आणि अपघात टाळण्यासाठी फटाक्यांबाबत नवीन नियम जाहीर केलेत. राज्यात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान रात्री ८ ते १० या वेळेतच फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी असेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे निर्बंध लादले असून, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बंगळुरू पोलिसांनीही नागरिकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलंय. बंदी असलेल्या ठिकाणी फटाके फोडू नका आणि लहान मुलांवर लक्ष ठेवा, असं पोलिसांनी सांगितलंय. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आलाय.
फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार
सरकारच्या नियमांनुसार, ८ ते १० नोव्हेंबर या तीन दिवसांत फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येतील. सणासुदीच्या काळात हवेची गुणवत्ता खराब होऊ नये आणि आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतलाय.
ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सूचना दिल्या आहेत. या वेळेव्यतिरिक्त फटाके फोडल्यास कडक कारवाई केली जाईल.
कर्नाटकात फक्त ग्रीन फटाक्यांनाच परवानगी
कर्नाटक सरकारने दिवाळीत फक्त ग्रीन फटाके विकायला आणि फोडायला परवानगी दिलीये. हे फटाके अस्सल आहेत की नाही, हे ओळखण्यासाठी त्यांच्या बॉक्सवर क्यूआर (QR) कोड असणं बंधनकारक आहे.
क्यूआर कोड नसलेले फटाके विकणे, त्यांची वाहतूक करणे किंवा ते फोडणे यावर पूर्ण बंदी आहे. असे फटाके जप्त केले जातील आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिलाय.
रुग्णालय, शाळा आणि धार्मिक स्थळांजवळ फटाक्यांवर बंदी
रुग्णालय, शाळा, पेट्रोल पंप, धार्मिक स्थळे किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत, असं आवाहन करण्यात आलंय. विशेषतः रुग्णालये आणि मोठ्या प्रार्थनास्थळांच्या आजूबाजूचा परिसर 'फटाकेमुक्त' ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होईल असं काहीही करू नका, अशी विनंती नागरिकांना केलीये.
बंगळुरू पोलिसांच्या सुरक्षिततेच्या टिप्स
बंगळुरू पोलिसांनी दिवाळी साजरी करताना काही बेसिक काळजी घेण्याचं आवाहन केलंय. लहान मुले फटाके फोडताना मोठ्यांनी त्यांच्यासोबत असावं. तसेच, सुरक्षेची साधने आणि अग्निशामक यंत्र जवळ ठेवावं.
अधिकृत दुकानातूनच फटाके विकत घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिलाय. बेकायदेशीर विक्री किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्वरित पोलिसांना कळवा, असंही सांगण्यात आलंय.
नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
फटाक्यांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिलाय. अनधिकृत फटाक्यांची विक्री, ठरलेल्या वेळेबाहेर फटाके फोडणे आणि सुरक्षेचे नियम न पाळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.
पारंपरिक दिवे लावून इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करा आणि फटाक्यांचा वापर कमीत कमी करा, असं आवाहन सरकारने केलंय. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याचा त्रास असलेले लोक आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतलाय.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिक ११२ या हेल्पलाइनवर किंवा १०८ या रुग्णवाहिकेच्या नंबरवर संपर्क साधू शकतात.




