डिसेंबर २०२५ मध्ये ढाक्यात झालेल्या शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता भारतात सापडले आहेत. पश्चिम बंगालच्या बोंगाव बॉर्डरवरून दोन बांगलादेशी संशयितांना अटक झाली आहे. हेच हादीचे खरे मारेकरी आहेत का? आणि या कारवाईमुळे भारत-बांगलादेश संबंधांना नवं वळण मिळणार का? असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

India-Bangladesh Diplomatic Impact: डिसेंबर २०२५ मध्ये ढाक्यात झालेल्या एका राजकीय हत्येने संपूर्ण बांगलादेश हादरला होता. या घटनेनंतर भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण आता पश्चिम बंगालमधून दोन संशयित आरोपींना अटक झाल्याने या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. ही अटक दोन्ही देशांमधील विश्वास पुन्हा मजबूत करू शकेल का?

ढाक्यात निवडणूक प्रचारावेळी काय घडलं होतं?

१२ डिसेंबर २०२५ रोजी ढाक्यात एका निवडणूक कार्यक्रमादरम्यान राजकीय कार्यकर्ते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी ते निवडणूक प्रचारात व्यस्त होते. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आलं, पण १८ डिसेंबरला रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मोठा राजकीय वाद निर्माण झाला. हत्येनंतर आरोपी भारतात पळून गेले आणि त्यांना इथे आश्रय मिळाल्याचा आरोप अनेकांनी केला. मात्र, भारत सरकारने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले होते आणि आपल्या भूमीचा वापर कोणत्याही गुन्हेगाराला वाचवण्यासाठी होऊ देणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

भारतात लपले होते का मारेकरी?

रविवारी पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) एक मोठी कारवाई केली. आपल्या देशात गंभीर गुन्हा करून पळालेले दोन बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोंगाव बॉर्डर परिसरात छापा टाकण्यात आला. याच कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांची नावं फैसल करीम मसूद (३७, पटुआखाली, बांगलादेश) आणि आलमगीर हुसैन (३४, ढाका, बांगलादेश) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत दोघांनी उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशातून पळ काढल्याची कबुली दिली आहे.

मेघालय बॉर्डरवरून भारतात कशी केली एन्ट्री?

तपासात असं समोर आलं आहे की, दोन्ही आरोपी मेघालय बॉर्डरच्या मार्गाने बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणांवरून पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. ते बांगलादेशात परत जाण्यासाठी बोंगाव सीमेजवळ लपून बसले होते, पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना पकडलं. हत्येचा गुन्हा बांगलादेशात घडल्यामुळे भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणात थेट खटला चालवू शकत नाहीत. सध्या दोन्ही आरोपींवर फॉरेनर्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि नंतर त्यांना बांगलादेशात डिपोर्ट केलं जाऊ शकतं.

अटकेनंतर बांगलादेशची प्रतिक्रिया काय?

कोलकाता येथील बांगलादेशच्या डेप्युटी हाय कमिशनने सांगितलं की, त्यांना या अटकेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी भारत सरकारकडे दोन्ही आरोपींना भेटण्यासाठी कॉन्सुलर ॲक्सेसची मागणीही केली आहे. हे प्रकरण महत्त्वाचं आहे कारण उस्मान हादी हे बांगलादेशच्या राजकारणातील एक चर्चित चेहरा होते. ते २०२४ मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनांमध्ये खूप सक्रिय होते.

या अटकेमुळे भारत-बांगलादेश संबंध सुधारणार?

गेल्या काही काळापासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये थोडा दुरावा आला होता. पण नुकतंच बांगलादेशचं नवीन सरकार आणि भारत यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला आहे. हादी हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेमुळे भारताने आपल्या भूमीला गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू देणार नाही, असा संदेश दिला आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशचे मिलिटरी इंटेलिजन्स प्रमुख मेजर जनरल मोहम्मद कैसर रशीद चौधरी यांनी नवी दिल्लीला भेट देऊन भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लगेचच ही अटक झाली आहे.

ही घटना भारत-बांगलादेश सहकार्याचं नवं पर्व आहे का?

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुमारे ४००० किलोमीटर लांबीची सीमा आहे, ज्यातील अनेक भाग अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांना एका देशातून दुसऱ्या देशात पळून जाणं सोपं होतं. पण या कारवाईनंतर स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, दोन्ही देश आता सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अटकेमुळे केवळ एका मोठ्या राजकीय हत्या प्रकरणाचा तपास पुढे जाणार नाही, तर भारत-बांगलादेश संबंधांमध्येही नवा विश्वास निर्माण होऊ शकतो, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे.