सार

Ayodhya Ram Mandir : श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच एशियानेट न्यूजची टीम अयोध्येत दाखल झाली आहे. स्थानिक दुकानदारांच्या माहितीनुसार, “येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने रोजगाराच्या दृष्टीकोनातून फायदा होऊ शकतो”.

 

Ayodhya Ram Mandir News : श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रामपथावर चहाविक्रीचे काम करणारे आशिष यांनी सांगितले की, "रामललांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत आहेत. कोट्यवधी पर्यटक आल्याने विक्री वाढल्याने नफा झाला आहे. सुरुवातीला आंदोलनामुळे दुकान चालवणे कठीण जात होते. 

रामपथाच्या रुंदीकरणादरम्यान माझंही दुकान पाडण्यात आले. 20 फुट लांब पसरलेल्या जागेवर असणारी दुकाने आता केवळ पाच फुट जागेवर आहेत. असे असले तरीही येत्या काही दिवसांत अयोध्येत पर्यटकांची गर्दी होईल", अशी आशा व्यक्त करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

राम मंदिराच्या प्रतिकृतीची देशभरात मागणी

अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली जात आहे. पण या मंदिराच्या प्रतिकृतीची देशातच नव्हे तर जगभरामध्ये मागणी वाढत आहे. कित्येक दुकानांमध्ये मंदिराची प्रतिकृती खूप आधीपासूनच विकली जात आहे, ऑनलाइन विक्रीमध्येही यास खूप मोठी मागणी आहे.

सहादतगंजसह अनेक ठिकाणी दुकानदार याची निर्मिती करण्यात व्यस्त आहेत. रामकोट भागात श्री राम मंदिराच्या लाकडी स्वरुपातील प्रतिकृतीची विक्री करणारे विजय यांनी सांगितले की, "प्रतिकृतीची लहान-मोठ्या आकारात विक्री केली जात आहे आणि याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.

दिवसभरात सात ते आठ प्रतिकृतींची विक्री होते. आठ आणि 10 इंच आकारात असलेल्या मंदिराच्या प्रतिकृती सर्वाधिक विकल्या जात आहेत. राम दरबार, राम नाव असलेले पेन, डायरी या सर्व वस्तू देखील दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत".

विक्रेत्यांची संख्या वाढली

अयोध्येत भाविकांची संख्या जसजशी वाढत आहे; तसे हातामध्ये फुलांचा हार, खेळणी, झेंडे, मेकअपच्या वस्तू विकणाऱ्यांची संख्याही वाढलीय. पूर्वी मर्यादित ठिकाणी या वस्तूंची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत होते. पण आता हातामध्ये सामान घेऊन विक्री करणारे लोक गर्दीच्या ठिकाणी सहज आढळत आहेत.

रस्त्याच्या कडेला फुलांच्या माळेची विक्री करणाऱ्या सीमा कश्यप सांगतात की, दररोज एक हजार ते बाराशे रुपयांची कमाई होत आहे. मंदिरांजवळील फुले, फुलांचा हार, प्रसाद विकणारे दुकानदार आता व्यस्त झाले आहेत. 

याचे मुख्य कारण म्हणजे भाविकांची वाढलेली संख्या. याचा सर्वाधिक फायदा फुलविक्रेत्यांना होत असल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यांच्या दरदिवशीच्या कमाईमध्ये हजारो रुपयांची वाढ झाली आहे.

द्रोण-पत्रावळी, मातीची भांडी, शुद्ध पाण्याची मागणी

स्थानिक रहिवासी विनोद त्रिपाठी सांगतात की, राम मंदिराच्या निर्मितीमुळे दुकानदारांनी आपापल्या विक्री साहित्यांच्या संख्येत वाढ केली आहे. द्रोण-पत्रावळी, मातीची भांडी आणि बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे या सामग्रींशी संबंधित असलेल्या दुकानांसह उद्योग क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेकरी प्रोडक्ट्सच्या दुकानदारांनीही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. 

येत्या काळात पर्यटकांची मोठी संख्या वाढेल, याचा अंदाज घेऊन स्थानिकही आपापली दुकाने थाटत आहेत. गेल्या दोन वर्षांत ई-रिक्षांची संख्याही दोन ते तीन पटीने वाढली आहे. शिवकुमार म्हणतात की, प्रवासी येत आहेत. एका दिवसात एक हजार रुपयांपर्यंत कमाई होतेय. ट्रॅव्हल्समध्ये काम करणाऱ्यांनीही वाहनांचे बुकिंग वाढल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत बुकिंगची संख्या व नफा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थांच्या उद्योगांमध्ये लक्ष्णीय वाढ

अयोध्येत खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांत लक्षणीय वाढ झाली आहे. लक्ष्मी सांगतात की, राम मंदिर आंदोलनाच्या काळापासून दुकान परिसरात शांतता होती. मात्र दीपोत्सव कार्यक्रम आणि आता राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. नारळपाणी विक्रेते राम बहादूर सांगतात की, एका दिवसात दोन ते ती हजार रुपयांची कमाई होते. पण आता स्टॉल लावण्यास परवानगी नाही. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या लोकांनाही जागा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. फळांच्या गाड्या आणि स्टॉल्स लावणाऱ्यांचीही तीच अवस्था आहे.

आणखी वाचा :

Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?

Exclusive : रामसेवेसाठी संपूर्ण जीवन केले समर्पित, सरकारी नोकरीही गमावली! जाणून या रामभक्ताची कहाणी

AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?