अयोध्येत दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. २,१०० ड्रोनच्या माध्यमातून रामायणाचे दृश्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

अयोध्या (उत्तर प्रदेश): दिवाळी सुरू झाली आहे. अयोध्येतील रामलल्ला मंदिरही सणासाठी सज्ज झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शरयू नदीच्या ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक मातीचे दिवे लावून १० व्या दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, मंदिरे आणि धार्मिक स्थळे आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आली आहेत. रामजन्मभूमी मंदिरही विशेष प्रकाशयोजनेने उजळून निघाले आहे. भव्य शरयू महाआरती, २,१०० हून अधिक ड्रोनच्या साहाय्याने रामायणाचं दृश्य आणि पाच देशांतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.

सूर्यवंशाचा राजा भगवान श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत दिवाळीला विशेष महत्त्व आहे. या पवित्र मुहूर्तावर देवतांच्या नावावर आणि संख्येनुसार दिवे लावण्याची परंपरा श्रद्धा आणि आध्यात्मिक जाणीव दर्शवते. अयोध्येचे हे भव्य दृश्य केवळ डोळ्यांचं पारणं फेडणारं नाही, तर भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरेचे जिवंत उदाहरण आहे.

आकाशात रोषणाई

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २,१४७ लोकप्रतिनिधी, स्थानिक सदस्य आणि नागरिक सामूहिक महाआरतीत सहभागी होणार आहेत. मंत्रोच्चारासह होणारा हा धार्मिक सोहळा शरयूच्या तीरावर एक विशेष तेज निर्माण करेल. रात्री २,१०० ड्रोनच्या माध्यमातून रामायणातील प्रमुख प्रसंग आकाशात साकारले जातील. पाच देशांचे कलाकार विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

जगद्गुरूंचे अयोध्येत आगमन

जगद्गुरू स्वामी सतीशाचार्य जी महाराज हे उत्सव पाहण्यासाठी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत आले आहेत. सणाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विषद करताना सतीशाचार्य म्हणाले, "त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या आगमनावेळी ज्याप्रमाणे अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली होती, त्याचप्रमाणे आज योगी आदित्यनाथजी यांच्या प्रयत्नातून भगवान रामाची ही नगरी पुन्हा एकदा संपूर्ण जगाला प्रकाशाचा संदेश देत आहे."