आसाममधील पुराची परिस्थिती काहीशी सुधारत असली तरी संकट अद्याप कायम आहे. मात्र मृतांचा आकडा वाढला गेला आहे.

मुंबई : आसामला पुराचा फटका बसला गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची माहिती आहे. परंतु परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) रविवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार, चाराइदेव जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 68 वर पोहोचली आहे.

सध्या चाराइदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या पाच जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. शनिवारी ही संख्या सुमारे 6.55 लाख होती. त्यामुळे परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली तरी हजारो कुटुंबांचे जनजीवन अजूनही विस्कळीत झालेलेच आहे. 

चाराइदेव आणि शिवसागर सर्वाधिक प्रभावित

पूराचा सर्वाधिक फटका चाराइदेव जिल्ह्याला बसला आहे. येथे जवळपास 1.90 लाख नागरिक प्रभावित आहेत. त्यानंतर शिवसागर जिल्ह्यात 1.50 लाखांहून अधिक आणि जोरहाटमध्ये सुमारे 1.40 लाख नागरिक पुराच्या विळख्यात अडकले गेले आहेत. गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यांमध्येही पूरस्थिती गंभीर असून अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे.

354 मदत छावण्यांमध्ये हजारो विस्थापितांना आश्रय

पूरग्रस्त नागरिकांसाठी प्रशासनाने चार जिल्ह्यांमध्ये 354 मदत छावण्या आणि मदत वितरण केंद्रे सुरू केली आहेत. या छावण्यांमध्ये 37,724 विस्थापित नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यात आला आहे. नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

लष्करासह विविध यंत्रणांकडून बचावकार्य सुरू

पूरग्रस्त भागात भारतीय लष्कर, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि पोलिसांकडून संयुक्तपणे बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.

763 गावे पाण्याखाली

पूरामुळे राज्यातील 763 गावे अजूनही पाण्याखाली आहेत. सुमारे 48,742 हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक बंधारे, रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नुमालीगढ परिसरातील धनसिरी नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

88 हजारांहून अधिक पशुधनालाही फटका

या पुराचा परिणाम पशुधनावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. ASDMA च्या अहवालानुसार, राज्यभरातील 88 हजारांहून अधिक पाळीव जनावरे आणि कुक्कुटपालनातील पक्षी पुरामुळे प्रभावित झाले आहेत. प्रशासनाकडून पशुधनासाठीही मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Scroll to load tweet…