Amit Shah on Dharmendra Pradhan Resign : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही पदापेक्षा विद्यार्थी, आपला देश अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. शनिवारी २५ जुलै रोजी त्यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पद सोडल्यानंतर देशभरातून अनेकांनी आनंद व्यक्त केला. तसंच मागील १० दिवसांपासून सुरू असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झालं, अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली पहिल्यांदा त्यांच्या राजीनाम्यावल भाष्य केलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित शाहांनी काय लिहिलंय?
'भाजप कार्यकर्त्यांसाठी देश, आपली तरुण पिढी आणि विद्यार्थी हे कोणत्याही पदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हे याचचं एक उत्तम उदाहरण आहे.
मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करतं. मोदी सरकार पेपर फुटीसारख्या घटना रोखण्यासाठी आवश्यक सुधारणांची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध आहे. नीट पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. या पावलांमुळे, मोदीजींनी घेतलेल्या निर्णयांमुळे नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
आपल्या कार्यकाळात श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत. मातृभाषेत परीक्षा देण्याची व्यवस्था, 'पीएम श्री' या शाळांचा विस्तार, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन, कौशल्य विकास आणि उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढवणं, तो मजबूत करणं, अशा अनेक महत्त्वाच्या सुधारणा त्यांच्या कार्यकाळात करण्यात आल्या आहेत.
परीक्षा सिस्टम अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दिशेने त्यांनी केलेले प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. त्यांचा कार्यकाळ हा भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने, त्यांनी केलेल्या संकल्प त्यांच्या कामाच्या निष्ठेचा पुरावा आहे'.

