एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघातामागे को-पायलटकडून 'लँडिंग गिअर'ऐवजी 'फ्लॅप्स' मागे घेतल्याने झालेली चूक कारणीभूत असल्याचा दावा एका विमानतज्ज्ञाने केला आहे. या अपघातात 241 प्रवाशांसह जमिनीवरील अनेक लोक मृत्युमुखी पडले.
एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघातामागे को-पायलटकडून झालेली गंभीर चूक कारणीभूत ठरली असावी, असा नवा दावा एका अनुभवी विमानतज्ज्ञाने केला आहे. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, जमिनीवरही अनेक लोक मृत्युमुखी पडले.
प्रसिद्ध व्यावसायिक वैमानिक आणि अमेरिकन एअरलाइन्सचे माजी कॅप्टन स्टीव्ह शाइब्नर यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर हे मत मांडले. लंडनच्या गॅटविककडे जाणाऱ्या 787 ड्रीमलाइनर विमानात को-पायलटला उताराच्या वेळी 'लँडिंग गिअर' मागे घ्यायला सांगितल्यावर, त्याने चुकून 'फ्लॅप्स' मागे घेतले असावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
ही घटना 12 जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत घडली. अपघाताचा नेमका कारण शोधण्यासाठी भारतातील अपघात तपास संस्थांनी काळात त्या विमानात सेवा बजावलेल्या इतर पायलट व क्रू सदस्यांची चौकशी करण्याची तयारी केली आहे.
तपासकर्ते आता ब्लॅक बॉक्समधील माहिती डिकोड करण्याच्या प्रक्रियेत असून, दुर्घटनेआधी नेमकं काय घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शाइब्नर म्हणाले, “हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे, पण मला वाटतं पायलटने को-पायलटला ‘गिअर अप’ असं सांगितलं आणि को-पायलटने चुकून फ्लॅप्स मागे घेतले असावेत. जर असं झालं असेल, तर ते बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतं विशेषतः विमानाने अचानक उड्डाण थांबवण्यामागचं कारण.”
त्यांनी सांगितलं की, उड्डाणादरम्यान फ्लॅप्सने विमानाला आवश्यक असलेला लिफ्ट मिळतो आणि त्यामुळे विमान हवेत जाते. मात्र या अपघाताच्या व्हिडिओ फुटेजमध्ये विंग्समध्ये असलेली ती लिफ्टिंग हालचाल दिसून आली नाही, त्यामुळे फ्लॅप्स आधीच मागे घेतले गेले असावेत, अशी शंका व्यक्त होत आहे. तसेच, लँडिंग गिअर देखील उड्डाणानंतर काही सेकंदांत मागे घेतले जातात, मात्र अपघातग्रस्त विमानात तसे झाले नसल्याचे दिसून आले.
एव्हिएशन तज्ज्ञांचं विश्लेषण
या अपघाताच्या फुटेजचं बारकाईने विश्लेषण केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली की, फ्लॅप्स मागे घेतले गेले आणि अंडरकॅरेज (लँडिंग गिअर) खालीच राहिले. बकिंघमशायर न्यू युनिव्हर्सिटीचे माजी वैमानिक आणि सीनियर लेक्चरर मार्को चॅन यांनी BBC शी बोलताना सांगितले, “फ्लॅप्स योग्यरित्या सेट न केल्यास मानवी चुका संभाव्य कारण ठरू शकतात. मात्र व्हिडिओचा रिझोल्यूशन खूप कमी आहे, त्यामुळे निश्चित सांगता येत नाही.”
घटना कशी घडली?
उड्डाणाच्या सुमारे 30 सेकंदानंतर विमान एकदम खाली आले आणि इमारतींवर आदळून स्फोटात जळून खाक झाले. व्हिडिओमध्ये हे दृश्य स्पष्ट दिसते. या अपघातात प्रमुख पायलट कॅप्टन सुमित सभरवाल आणि को-पायलट क्लाइव्ह कुंदर या दोघांचाही मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. सभरवाल यांच्या नावावर 8,200 तासांचा अनुभव होता, तर कुंदर यांच्याकडे सुमारे 1,100 तासांचा अनुभव होता. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ते यांत्रिक बिघाड की मानवी चूक, यावर सध्या अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.


