दिल्लीतील एका आलिशान हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या एका पायलटचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते, पण हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नवी दिल्ली: एअर इंडियाच्या एका कॉकपिट क्रू सदस्याचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंत कुंज परिसरातील एका हॉटेलमध्ये एअर इंडियाचा हा कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी काय माहिती दिली?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द ग्रँड' हॉटेलमधून एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याचा फोन आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत व्यक्ती एअर इंडियामध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत होती. ते १० सप्टेंबर रोजी हॉटेलमध्ये चेक-इन झाले होते. ११ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्यांच्या भावाने हॉटेल मॅनेजरशी संपर्क साधला. माझा भाऊ फोन उचलत नाही, असं त्यांनी मॅनेजरला सांगितलं.
त्यानंतर हॉटेल मॅनेजर त्यांच्या रूमवर गेले. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेलच्या मास्टर-कीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. त्यांना तातडीने सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच आम्ही तपास सुरू केला. मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे, एअर इंडियानेही आपल्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "काल रात्री आमच्या एका कॉकपिट क्रू सदस्याचं निधन झाल्याचं सांगताना खूप दुःख होत आहे," असं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
एअर इंडिया त्यांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात असून या दुःखद प्रसंगात आम्ही कुटुंबासोबत आहोत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
