सार
नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. एका बेकरी व्यावसायिकाने आपल्या पत्नीसोबत चालू असलेल्या घटस्फोटाच्या वादामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीतील एका प्रसिद्ध कॅफेचे सह-संस्थापक असलेल्या पुनीत खुराना यांचा मंगळवारी संध्याकाळी मॉडेल टाऊनच्या कल्याण विहार भागातील त्यांच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
आत्महत्येपुर्वी पत्नीला केला कॉल
कुटुंबीयांच्या मते, ‘३८ वर्षीय उद्योजक घटस्फोटाच्या वाढत्या तणावामुळे खूपच त्रस्त होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूपूर्वी पुनीत यांनी आपल्या पत्नीशी फोनवर संवाद साधला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांचं बेकरी व्यवसायाविषयी चर्चा केली. या चर्चेदरम्यान पत्नीने सांगितले की, नात्यातील तणाव आणि चालू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे तिला व्यवसायातून काढून टाकता येणार नाही. पुनीत हे आधीच प्रचंड तणावाचा सामना करत होते आणि हा वाद त्यांच्यासाठी कदाचित शेवटचा धक्का ठरला असावा.' असे एका नातेवाईकाने सांगितले.
पोलीस पत्नीची करणार चौकशी
पोलिसांनी सांगितले की पुनीतचा फोन जप्त करण्यात आला असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी त्याचा तपास केला जाईल. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी त्यांच्या पत्नीची चौकशी करण्याचाही निर्णय घेतला आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती?
या प्रकरणाची तुलना नुकत्याच घडलेल्या बेंगळुरूतील टेक्नॉलॉजिस्ट अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणाशी केली जात आहे. डिसेंबर महिन्यात ३४ वर्षीय खासगी कंपनीतील डेप्युटी जनरल मॅनेजर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी २४ पानी सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ संदेश मागे ठेवला होता, ज्यामध्ये पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला होता. अतुल सुभाष यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या होत्या.
आणखी वाचा-