पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ चं ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अहमदाबादमध्ये याची तयारीही सुरू झालीय. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) मंगळवारी अधिकृतपणे स्पष्ट केलंय की, ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत भारतही सामील आहे.
International Olympic Committee: २०३६ च्या ऑलिम्पिक (2036 Olympics) यजमानपदासाठी फक्त भारतच नाही, तर आणखी काही देश शर्यतीत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी सांगितलं की, भारतासोबतच जर्मनी (Germany), हंगेरी (Hungary), कतार (Qatar), दक्षिण कोरिया (Republic of Korea), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि तुर्की (Türkiye) हे सात देश सध्या आयओसीच्या 'कंटिन्युअस डायलॉग'मध्ये आहेत. भारताकडून अहमदाबादचं (Ahmedabad) नाव संभाव्य ठिकाण म्हणून आघाडीवर आहे. भारताने २०२४ मध्येच २०३६ चं ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी अधिकृतपणे 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' जमा केलं होतं. पण आयओसीच्या अध्यक्षपदी कर्स्टी कोव्हेंट्री (Kirsty Coventry) यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर यजमान देश निवडण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवली होती. आता आयओसीने या प्रक्रियेचे पुढचे टप्पे स्पष्ट केले आहेत.
कशी असेल २०३६ ऑलिम्पिक यजमानपदाची निवड प्रक्रिया?
आयओसीच्या नव्या रोडमॅपनुसार, या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही नव्या देशाला २०३६ ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत सामील होण्याची संधी दिली जाईल. सध्या 'कंटिन्युअस डायलॉग'मध्ये असलेले सात देश या वर्षी नोव्हेंबरमध्ये फ्युचर होस्ट कमिशनसमोर आपलं व्हर्च्युअल प्रेझेंटेशन देतील. त्यानंतर आयओसी प्रत्येक प्रस्तावाची पडताळणी करेल. मार्च २०२७ पर्यंत एक्झिक्युटिव्ह बोर्ड 'स्ट्रॅटेजिक डायलॉग' सुरू करू शकतं. डिसेंबर २०२८ च्या आसपास निवडक देशांना 'टार्गेटेड डायलॉग'साठी बोलावण्याची योजना आहे. अखेर २०२९ च्या मध्यावर आयओसीचे सदस्य २०३६ ऑलिम्पिकचा यजमान देश निवडतील. यजमान देश निवडताना आयओसी अनेक गोष्टींचा विचार करेल. यात व्हेन्यू मास्टरप्लॅन, खेळाडूंचा अनुभव, बजेट, सरकारी आणि लोकांचा पाठिंबा, आयोजन करण्याची क्षमता आणि ऑलिम्पिकनंतर स्थानिक भागाला होणारा दीर्घकालीन फायदा या गोष्टी तपासल्या जातील. प्रस्तावित ऑलिम्पिकचा विचार स्थानिक विकास योजना आणि ऑलिम्पिकच्या मोठ्या उद्दिष्टांशी किती मिळताजुळता आहे, हेही पाहिलं जाईल.
खेळाडूंच्या अनुभवाला आयओसीचं प्राधान्य
पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या कोव्हेंट्री यांनी सांगितलं की, २०३६ ऑलिम्पिकचा यजमान देश निवडताना खेळाडूंच्या अनुभवाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जाईल. त्या म्हणाल्या, 'गेम्स कुठेही होवोत, एक गोष्ट कधीच बदलता कामा नये, ती म्हणजे आपण जे काही करतो, त्याच्या केंद्रस्थानी खेळाडूच असले पाहिजेत.' भारताच्या २०३६ ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रयत्नांना गेल्या दोन वर्षांत चांगलाच वेग आलाय. २०२४ मध्ये अधिकृत पत्र दिल्यानंतर, २०२५ मध्ये एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने लुझान (Lausanne) येथील आयओसीच्या मुख्यालयात जाऊन प्रस्तावित योजनेवर चर्चा केली. या शिष्टमंडळात गुजरातचे क्रीडामंत्री हर्ष संघवी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा (PT Usha) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. २०३० मध्ये भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2030) होणार आहेत. यामुळे ऑलिम्पिक यजमानपदाची जबाबदारी मिळण्याची भारताची आशा आणखी वाढली आहे.
