सीमा हैदर प्रकरणानंतर सीमेपलीकडून भारतात येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) एक १७ वर्षांची मुलगी LoC ओलांडून भारतात आली असून, तिला जम्मूत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जम्मू-काश्मीर (३ ऑक्टोबर): प्रेमासाठी पाकिस्तानातून कोणतीही कागदपत्रे नसताना भारतात आलेली सीमा हैदर आता चांगलीच परिचयाची झाली आहे. अशाच प्रकारे सीमा ओलांडून इकडून तिकडे जाण्याच्या घटना घडत आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) सीमा ओलांडून भारतात आलेल्या एका १७ वर्षांच्या मुलीला भारतीय लष्कराने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर तिला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
सीमा ओलांडून आलेली १७ वर्षांची मुलगी
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची गस्त सुरू होती. LoC वर बारीक लक्ष ठेवून असलेल्या जवानांना सीमेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. एक १७ वर्षांची मुलगी सीमा ओलांडून येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. लष्कराचे जवान लगेच अलर्ट झाले. त्यांनी तातडीने या मुलीला घेरलं आणि तिला ताब्यात घेतलं.
लष्कराकडून पोलिसांच्या स्वाधीन
भारतीय लष्कराने या मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. तेव्हा ही मुलगी पाकव्याप्त काश्मीरमधील खुईरेट्टा (Khuiretta) इथली रहिवासी असल्याचं समोर आलं. तिने तिचं नाव एस. अझीम असं सांगितलं असून, ती मोहम्मद अझीम यांची मुलगी आहे. पुढील चौकशीसाठी लष्कराने तिला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी या १७ वर्षीय मुलीची कसून चौकशी केली. प्राथमिक माहितीनुसार, ती चुकून सीमा ओलांडून आल्याचं समजतंय. ही मुलगी आपल्या घरापासून थोडी दूर आली होती आणि रस्ता भटकून तिने भारतीय हद्दीत प्रवेश केला. सध्या पोलीस तिच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. जर कोणी चुकून किंवा अनावधानाने भारतीय हद्दीत आलं, तर त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याची प्रक्रिया असते. पण या घुसखोरीमागे दुसरा काही हेतू असेल, तर मात्र तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
सध्या पोलीस या मुलीकडून अधिक माहिती घेत असून सर्व बाजूंची पडताळणी करत आहेत. जर ती खरंच चुकून भारतात आल्याचं सिद्ध झालं, तर ठरलेल्या प्रक्रियेनुसार तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं जाईल.
