मंगळवारी दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 246 नोंदवला गेला, जो 'वाईट' श्रेणीत येतो. शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर प्रदूषणाची पातळी वेगवेगळी असताना, सरकारी आकडेवारीच्या अचूकतेवरून राजकीय वादही सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7:05 वाजता दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 246 नोंदवला गेला. हा आकडा हवेची 'वाईट' स्थिती दर्शवतो. सिरी फोर्ट केंद्रावर सर्वात वाईट, म्हणजे 341 इतका AQI नोंदवला गेला, जो 'अतिशय वाईट' श्रेणीत येतो.

त्यानंतर कॉमनवेल्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (338), NSUT जाफरपूर (336), ITO (335), तालकटोरा गार्डन (326), पुसा (322), बुराडी क्रॉसिंग (318), चांदणी चौक (316), NIH नरेला (313), नॉर्थ कॅम्पस (310) आणि DTU येथे (303) AQI होता.

कँटोन्मेंट भागात सर्वात कमी 151 AQI नोंदवला गेला. IMD लोधी रोड (182), मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम (185), बदरपूर (188) आणि ओखला फेज-2 (192) येथे AQI 'मध्यम' पातळीवर होता. CPCB नुसार, दिल्लीत PM 2.5 हा मुख्य प्रदूषक घटक आहे.

मंगळवारी सकाळी दिल्लीवर धुरक्याची हलकी चादर पाहायला मिळाली. CPCB च्या वर्गीकरणानुसार, 0 ते 50 AQI 'चांगला', 51-100 'समाधानकारक', 101-200 'मध्यम', 201-300 'वाईट', 301-400 'अतिशय वाईट' आणि 401-500 'गंभीर' मानला जातो.

प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार ठिकठिकाणी पाण्याचे फवारे मारत असून इतरही उपाययोजना करत आहे. 6 नोव्हेंबरला AQI 400 च्या वर (गंभीर श्रेणी) गेल्यावर, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या भागातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) 'GRAP III' लागू करण्याचे आदेश दिले होते.

यावरून दिल्लीत राजकारणही तापलं आहे. सत्ताधारी भाजपने दिल्लीच्या खराब हवेसाठी आधीच्या आम आदमी पार्टी (AAP) सरकारला जबाबदार धरलंय. तर, 'आप'चे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी रविवारी सरकारच्या AQI डेटामध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला.

अनेक केंद्रांवरील आकडेवारी शहराची खरी स्थिती दाखवत नसल्याचा दावा त्यांनी केला. "आज वृत्तपत्रांमध्ये आलेले आकडे सरकारच्या AQI डेटामधील कथित गडबड उघड करतात... आयआयटी दिल्ली हा हिरवागार आणि स्वच्छ परिसर असूनही तिथे शहरातील सर्वाधिक प्रदूषण दाखवलं आहे," असं ते म्हणाले.