ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या लग्नाच्या तोंडावर घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ऐनवेळी लग्न मोडल्यानंतर, त्यांनी स्वाभिमानाने तो प्रस्ताव पुन्हा नाकारला आणि स्वतंत्र महिलांविषयीच्या सामाजिक मानसिकतेवर भाष्य केले.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत वेदनादायक अनुभव नुकताच उघड केला आहे. सगळ्या तयारीनंतर, अगदी लग्नाच्या तोंडावर असताना त्यांचे लग्न अचानक रद्द झाले होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
नीना गुप्ता काय म्हणाल्या?
नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचा साखरपुडा झाला होता आणि त्या लग्नाच्या तयारीसाठी दिल्लीमध्ये कपडे आणि दागिने खरेदी करत होत्या. त्याचवेळी त्यांना अचानक एक फोन आला आणि सांगण्यात आलं की लग्न होणार नाही. हा फोन ऐकून त्या पूर्णपणे हादरल्या. जेव्हा त्यांनी लग्न रद्द होण्याचं कारण विचारलं, तेव्हा नवऱ्याने सांगितलं की त्याला साइनसचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मात्र, आजही नीना गुप्ता यांना त्या निर्णयामागचं खरं कारण काय होतं, हे समजलेलं नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
त्यांनी तो प्रस्ताव नाकारला
या घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी तोच व्यक्ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात आला आणि पुन्हा लग्नाचा प्रस्ताव दिला. पण तोपर्यंत नीना गुप्ता यांचा निर्णय ठाम झाला होता. त्यांनी तो प्रस्ताव नम्रपणे पण ठामपणे नाकारला. या अनुभवाबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी समाजातील मानसिकतेवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की आजही अनेक पुरुषांना स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि मजबूत व्यक्तिमत्त्व असलेल्या महिला स्वीकारणं कठीण जातं. प्रत्येक पुरुषाबद्दल असं नाही, पण समाजात अशी मानसिकता अजूनही अस्तित्वात आहे, असं त्यांनी नमूद केलं.
नीना गुप्ता यांची ही कहाणी केवळ एक वैयक्तिक अनुभव नाही, तर ती स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याचा संदेश देते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी स्वतःचा सन्मान जपणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्या अनुभवातून दिसून येतं.


