रुपेरी पडद्यावर राज्य करणारे रजनीकांत कधीकाळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास, कष्ट आणि यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे १० महत्त्वाचे धडे आपण पाहूया.
बस कंडक्टर ते सुपरस्टार!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी, अथांग पैसा किंवा मोठ्या संधीच असायला हव्या असं मुळीच नाही. अनेकदा कठीण परिस्थितीच आपल्यातली खरी ताकद दाखवून देते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचं आयुष्य याचं उत्तम उदाहरण आहे. कधीकाळी बसमध्ये तिकीट फाडणारे रजनीकांत आज कोट्यवधी रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या या अफाट यशामागे फक्त त्यांची खास स्टाईल किंवा अभिनय नाही, तर प्रचंड कष्ट आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.
रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी हमाली केली, सुतारकाम केलं आणि पुढे ते बस कंडक्टर म्हणूनही काम करू लागले. पण अभिनयाची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती आणि याच ध्यासाने त्यांना ग्लॅमर जगतात आणलं.
रजनीकांत यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे १० मोलाचे धडे
१. परिस्थिती कोणतीही असो, जिद्द सोडू नका
तुमची सुरुवात कशीही झाली असली, तरी भविष्य बदलण्याची ताकद तुमच्या स्वतःच्या हातात असते. रजनीकांत यांनी अनंत अडचणींवर मात करून सुपरस्टारपद मिळवलं. त्यामुळे छोट्या सुरवातीला कधीही कमी समजू नका.
२. आपल्या कामावर मनापासून प्रेम करा
यशासाठी मेहनतीसोबतच कामाची आवड असणं खूप गरजेचं आहे. कामाला ओझं न मानता ते आनंदाने केलं, की त्यात यश आणि समाधान दोन्ही मिळतं.
३. यश मिळालं तरी आपले दिवस विसरू नका
आज यशाच्या शिखरावर असूनही रजनीकांत आपले कंडक्टरचे दिवस कधीच विसरत नाहीत. माणूस कितीही मोठा झाला, तरी आपले जुने दिवस आणि कठीण काळात मदत करणाऱ्या माणसांना कधीच विसरू नये.
४. आरोग्य हीच खरी संपत्ती
पैसा आणि करिअरच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि व्यायामासाठी वेळ काढा. शरीर साथ देईल तेव्हाच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
५. गरज आणि हाव यातील फरक ओळखा
चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा असणं गैर नाही. पण गरजा भागल्यानंतरही फक्त पैशाच्या मागे पळणं योग्य नाही. पैशापेक्षा मनाची शांती आणि नात्यांना जास्त महत्त्व द्या.
६. कठीण काळालाच आपली ताकद बनवा
संकटं आपल्याला संयम, धैर्य आणि जगण्याचं मोल शिकवतात. अडचणींना न घाबरता त्यांच्याकडून धडा घेऊन पुढे जायला हवं.
७. नेहमी सकारात्मक विचार ठेवा
अपयशाची भीती आणि नकारात्मक विचार आपला आत्मविश्वास कमी करतात. समस्यांना सामोरं जाऊन त्यावर मार्ग शोधण्याची वृत्ती ठेवा.
८. तत्त्वं आणि मूल्यांशी तडजोड करू नका
पैसा, नाव आणि प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान जास्त महत्त्वाचा असतो. यशस्वी होताना कधीही चुकीचा मार्ग निवडू नका.
९. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा
काम कोणतंही असो, त्यासाठी पूर्ण तयारी आणि मेहनत हवी. तुम्ही विद्यार्थी असा किंवा नोकरदार, जबाबदारीने काम केलं की फळ उत्तमच मिळतं.
१०. प्रसिद्धीपेक्षा मानसिक शांततेला प्राधान्य द्या
फक्त पैसा आणि प्रसिद्धी हेच आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. कुटुंब, मित्र आणि मानसिक शांततेसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. खरी समृद्धी मनाच्या समाधणात असते.




