एका रिपोर्टनुसार, नितेश तिवारींच्या 'रामायण पार्ट १' मध्ये सनी देओलची भूमिका शेवटच्या क्षणी दाखवली जाऊ शकते. हनुमानाच्या भूमिकेतील त्याची एन्ट्री सिनेमाच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट निर्माण करून सिक्वेलबद्दलची उत्सुकता वाढवू शकते.
'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रचंड चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या प्रमोशनची पहिली झलक समोर आल्यापासून चाहत्यांना एकाच गोष्टीची उत्सुकता आहे - ती म्हणजे सनी देओलच्या भूमिकेबद्दल.
आता 'बॉलिवूड हंगामा'च्या एका रिपोर्टनुसार, सनी देओल 'रामायण पार्ट १' मध्ये सुरुवातीपासून दिसणार नाहीये. असं म्हटलं जातंय की, सिनेमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात त्याची एन्ट्री होईल.
इतकंच नाही, तर सिनेमा संपताना क्रेडिट्सच्या आधी किंवा अगदी क्रेडिट्सच्या नंतर (पोस्ट-क्रेडिट सीन) सनीची एन्ट्री दाखवली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. अर्थात, सिनेमाच्या निर्मात्यांनी अजून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
'बाहुबली'सारखा क्लायमॅक्स ठेवण्याचा निर्मात्यांचा प्लॅन?
जर हा रिपोर्ट खरा ठरला, तर सनी देओलची एन्ट्री फक्त हनुमानाच्या भूमिकेची ओळख करून देण्यापुरती मर्यादित नसेल.
निर्मात्यांना 'रामायण पार्ट १'चा शेवट असा करायचा आहे की, प्रेक्षकांच्या मनात पुढे काय होणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण होईल. या रणनीतीची तुलना 'बाहुबली: द बिगिनिंग'च्या शेवटाशी केली जात आहे.
'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?' या एका प्रश्नाने 'बाहुबली २' साठी जी उत्सुकता निर्माण केली होती, तसाच काहीसा प्रकार इथेही पाहायला मिळू शकतो.
त्याचप्रमाणे, 'रामायण पार्ट १' मध्ये सनी देओलची दमदार एन्ट्री शेवटच्या क्षणी दाखवून दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचा निर्मात्यांचा प्लॅन असू शकतो. हनुमानाच्या भूमिकेतील ही धमाकेदार एन्ट्री प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही चर्चेत ठेवेल आणि 'रामायण पार्ट २' मध्ये ही भूमिका कथेला कोणतं वळण देणार, यावर विचार करायला भाग पाडेल.
'रामायण पार्ट १' बॉलिवूडमधील सर्वात मोठा प्रोजेक्ट
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या भारतीय सिनेमांपैकी एक ठरणार आहे.
या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची भूमिका साकारणार असून, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. याशिवाय अरुण गोविल महाराज दशरथाच्या, लारा दत्ता कैकेयीच्या आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे.
सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असून, त्याची ही एन्ट्री सिनेमातील सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण' मोठ्या बजेटमध्ये तयार होत असून तो दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'रामायण पार्ट १' दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


