गायक झुबिन गर्ग यांचे नुकतेच सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात निधन झाले. रविवारी त्यांचे पार्थिव शरीर गुवाहाटीत पोहोचले. आपल्या लाडक्या गायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते त्यांच्या घराबाहेर जमले होते.
आसामी गायक झुबिन गर्ग यांचे पार्थिव शरीर अखेर रविवारी सकाळी भारतात पोहोचले. दोन दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन यांचा अपघात झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर कुठे अंत्यसंस्कार करायचे हे ठरवले जाणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री झुबिन गर्ग यांचे पार्थिव घेण्यासाठी दिल्लीत
शनिवारी शवविच्छेदनानंतर झुबिन गर्ग यांचा मृतदेह भारतीय राजदूताकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव सिंगापूरहून दिल्लीत पोहोचले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा त्यांचे पार्थिव घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटाही होत्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गायकाचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गुवाहाटीच्या सरुसजाई येथील अर्जुन भोगेश्वर बरुआ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात येईल. आसाम सरकारने गायकाच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणतेही मनोरंजन, औपचारिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक समारंभ होणार नाहीत, असे आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
झुबिन गर्ग यांच्याबद्दल
झुबिन गर्ग एक प्रसिद्ध गायक होते, ज्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली होती. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि त्यांनी आपल्या आईकडून संगीत शिकले होते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी तबला वाजवायला शिकले होते. त्यांनी 'अनामिका' या पहिल्या आसामी अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी जापुनोर जूर (१९९२), जुनाकी मोन (१९९३), माया (१९९४), आशा (१९९५) असे अल्बमही रिलीज केले. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि ती खूप पसंत केली गेली. २००६ मध्ये आलेल्या 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' या गाण्याने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांनी मणिपुरी, आदी, बोडो, इंग्रजी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, गोलपारिया, कन्नड, कार्बी, खासी, ओडिया, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू अशा ४० भाषांमध्ये गाणी गायली होती. इतकेच नाही तर ते ढोल, दोतारा, ड्रम, गिटार, हार्मोनिका, हार्मोनियम, मेंडोलिन, कीबोर्ड यांसारखी १२ वाद्ये वाजवू शकत होते.


