लग्नानंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पहिल्यांदाच मंदिरात एकत्र दिसले. या जोडीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त दोघांनीही इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या दोघांनी २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न केलं होतं.
Rashmika-Vijay Viral Post: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अनेक वर्षं आपलं नातं खासगी ठेवलं होतं, पण लग्नानंतर आता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नुकतंच लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नवं जोडपं आंध्र प्रदेशातील भक्त आंजनेय स्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलं. आपल्या आवडत्या जोडीला पाहण्यासाठी तिथे चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी या दोघांनीही हात हलवून चाहत्यांना अभिवादन केलं.
जोडप्याने शेअर केली इमोशनल पोस्ट
लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल विजय देवरकोंडाने एक खास पोस्ट शेअर केली. त्याने त्याच्या लग्नाचे आणि संगीत सोहळ्याचे अनेक सुंदर फोटो शेअर केले. सोबतच हैदराबादमध्ये झालेल्या रिसेप्शनचा एक पडद्यामागचा व्हिडिओही पोस्ट केला. आपल्या मेसेजमध्ये विजयने लिहिलं की, "आयुष्यात काही खास क्षण असे असतात जे कायमचे अविस्मरणीय बनतात. जर हे क्षण मनापासून जगले, तर त्यांच्या आठवणी नेहमीच आनंद देतात." तो पुढे म्हणाला की, "आता कामावर परतण्यापूर्वी, ज्यांनी आमचं लग्न खास बनवलं त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो."
रश्मिकाचा खास मेसेज: “सगळं स्वप्नासारखं वाटतंय”
रश्मिका मंदानानेही या निमित्ताने तिच्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले. तिने लिहिलं की, "लग्नाला एक महिना झाला यावर विश्वासच बसत नाहीये. माझ्यासाठी लग्न ही नेहमीच एक दूरची गोष्ट वाटायची, पण आता हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय." या प्रवासात प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या महिलांचे तिने विशेष आभार मानले. रश्मिका म्हणाली की, "हे प्रेम कायमस्वरूपी आहे."
उदयपूरमध्ये लग्न आणि हैदराबादमध्ये मोठं रिसेप्शन
रश्मिका आणि विजय यांनी २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही दिवसांनी, ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक मोठं रिसेप्शन आयोजित केलं होतं. लग्नानंतर या जोडप्याने आपल्या चाहत्यांसोबत आनंद वाटून घेण्यासाठी एक खास उपक्रम राबवला. त्यांनी भोपाळ, मुंबई, दिल्ली, जयपूर, चेन्नई, बंगळूरूसह देशातील अनेक शहरांमध्ये मिठाई वाटली. X (ट्विटर) वर शेअर केलेल्या नोटमध्ये या जोडप्याने लिहिलं की, "आमचे चाहते नेहमीच आमच्या आयुष्याचा आणि प्रेमाचा भाग राहिले आहेत, त्यामुळे आम्हाला हा आनंद सर्वांसोबत वाटायचा आहे." या जोडप्याने १ मार्च रोजी देशभरात मिठाईने भरलेले ट्रक पाठवले आणि अनेक मंदिरांमध्ये अन्नदानही केलं.


