Mardaani 3 : यशराज फिल्म्सने 'मर्दानी ३' ची अधिकृत घोषणा केली असून, राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, देशातून बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या गंभीर विषयावर आधारित आहे.
मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात दमदार आणि यशस्वी महिला प्रधान फ्रँचायझी 'मर्दानी' आता तिसऱ्या भागात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. यशराज फिल्म्सने (YRF) अखेर 'मर्दानी ३' ची अधिकृत घोषणा करत चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुन्हा एकदा राणी मुखर्जी आपल्या 'शिवानी शिवाजी रॉय' या आक्रमक पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
३० जानेवारीला होणार धमाका!
गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या फ्रँचायझीचा तिसरा भाग ३० जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी यावेळेस चित्रपटाचा विषय अधिक गंभीर आणि थरारक निवडला आहे. देशातून बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या प्रश्नावर हा चित्रपट भाष्य करणार असून, शिवानी शिवाजी रॉय या गुन्हेगारांशी 'वेळेशी शर्यत' लावताना दिसणार आहेत.
'डार्क, डेडली आणि ब्रूटल' अनुभव
स्वतः राणी मुखर्जीने यापूर्वीच सांगितले होते की, 'मर्दानी ३' हा भाग अधिक गडद आणि हिंसक असणार आहे. चांगुलपणा विरुद्ध भयावह वाईट प्रवृत्ती असा रक्तरंजित संघर्ष यात पाहायला मिळेल. यावेळेसचे कथानक समाजातील एका क्रूर वास्तवावर प्रहार करणारे असून ते प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवेल.
मर्दानीचा वारसा आणि नवे दिग्दर्शन
पहिल्या भागात मानवी तस्करी (Human Trafficking) आणि दुसऱ्या भागात विकृत सिरीयल रेपिस्टचा भयानक चेहरा उघड करण्यात आला होता. 'मर्दानी ३' चे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले असून, आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
यशराज फिल्म्सने शेअर केलेले पहिले पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये या 'एज-ऑफ-द-सीट' थ्रिलरबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


