अभिनेत्री कंगना राणावतच्या मते, जास्त प्रोटीन घेतल्याने बुद्धी कमी होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. उलट, मेंदूच्या आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत आणि तिची वादग्रस्त वक्तव्यं हे काही नवीन नाही. पण यावेळी तिने थेट फिटनेसप्रेमींनाच टार्गेट केलंय. जास्त प्रोटीन शेक प्यायल्याने माणसं मठ्ठ होतात आणि त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते, असं कंगना म्हणाली आहे. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रोटीन डाएटबद्दल कंगनाने केलेल्या या कमेंटमुळे जिममध्ये घाम गाळणारे आणि फिटनेसची काळजी घेणारे अनेकजण गोंधळात पडले आहेत. मग कंगना म्हणतेय तसं खरंच जास्त प्रोटीनमुळे माणसाचा बुद्ध्यांक (IQ) कमी होतो का? आरोग्य तज्ज्ञ आणि वैज्ञानिक संशोधन याबद्दल काय सांगतात? चला जाणून घेऊया.
वैज्ञानिक संशोधनानुसार, जास्त प्रोटीन खाल्ल्याने माणसाची बुद्धिमत्ता किंवा IQ कमी होतो, किंवा मेंदूला कायमचं नुकसान होतं, याला कोणताही पुरावा नाही. ही केवळ एक अफवा आहे. पण, चुकीच्या आहार पद्धतीमुळे तात्पुरतं मेंदूला थकवा जाणवू शकतो किंवा तो मंदावल्यासारखं वाटू शकतं. या तात्पुरत्या स्थितीला अनेकजण IQ कमी होणं असं समजण्याची चूक करतात.
हाय-प्रोटीन डाएटमध्ये 'ब्रेन फॉग' का जाणवतो?
प्रोटीन घेताना काही छोट्या चुका केल्यास मेंदूची कार्यक्षमता मंदावल्यासारखं वाटू शकतं.
- कर्बोदकांची (Carbohydrates) कमतरता: आपल्या मेंदूला वेगाने काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते. कीटो डाएटच्या नावाखाली जर तुम्ही कर्बोदकं पूर्णपणे बंद केली आणि फक्त प्रोटीनवर अवलंबून राहिलात, तर मेंदूला योग्य 'इंधन' मिळत नाही. यामुळे चिडचिड आणि सुस्ती येऊ शकते.
- डिहायड्रेशन (Dehydration): प्रोटीन पचवण्यासाठी किडनीला जास्त पाण्याची गरज असते. प्रोटीन घेऊन जर तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत, तर डिहायड्रेशन होतं. याचा थेट परिणाम एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर होतो.
- फूड कोमा: एकाच वेळी खूप जास्त प्रोटीन खाल्लं, तर ते पचवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं. यामुळे रक्ताचा प्रवाह मेंदूकडून पचनसंस्थेकडे वळतो. याचा परिणाम म्हणजे, जेवल्यानंतर प्रचंड सुस्ती येते आणि झोप लागल्यासारखं वाटतं.
वैज्ञानिक काय सांगतात?
मेंदूसाठी प्रोटीन आवश्यक: प्रोटीनमधील अमिनो ॲसिड हे डोपामाइन आणि सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरसाठी (Neurotransmitters) पाया आहेत, जे मेंदूसाठी अत्यंत आवश्यक असतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे मानसिक स्थिती आणि झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सुरक्षित प्रमाण: क्लिनिकल अभ्यासानुसार, एक निरोगी व्यक्ती दररोज आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे २.२ ग्रॅम ते ३.० ग्रॅमपर्यंत प्रोटीन घेऊ शकते.
किडनीचं आरोग्य: ज्यांना आधीपासूनच किडनीचा त्रास आहे, त्यांच्यासाठीच जास्त प्रोटीन हानिकारक ठरू शकतं. सामान्य व्यक्तीला यामुळे कोणताही धोका नसतो.

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
- प्रोटीनसोबत ओट्स, ब्राऊन राइस यांसारखी चांगली कर्बोदकं खा.
- प्रोटीनचं प्रमाण वाढवल्यावर पाणी पिण्याचं प्रमाणही वाढवा.
- दिवसभरातील प्रोटीन एकाच वेळी न घेता, ते २० ते ४० ग्रॅमच्या भागांमध्ये विभागून घ्या.
थोडक्यात, कंगना राणावत म्हणते त्याप्रमाणे प्रोटीनमुळे बुद्धी कमी होत नाही. पण, तुमचा डाएट संतुलित नसेल, तर तात्पुरती सुस्ती नक्कीच येऊ शकते. त्यामुळे प्रोटीन शेक घेणाऱ्यांनी त्यासोबत योग्य प्रमाणात पाणी आणि कर्बोदकं घेतली, तर मेंदू आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहील.

