गीता कपूरने बॉलिवूडला रामराम ठोकल्याची घोषणा केली आहे. नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असून, आता ती फक्त खास प्रोजेक्ट्समध्येच दिसणार आहे.
Geeta Kapur Quits Bollywood: हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कोरिओग्राफर आणि डान्स रिअॅलिटी शोजमधील ‘गीता माँ’ या नावाने ओळखली जाणारी गीता कपूर हिने बॉलिवूडला कायमचा राम राम केल्याची घोषणा केली आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका अलीकडील मुलाखतीत तिने स्वतः याची पुष्टी केली असून, यामागचं कारणही मोकळेपणाने सांगितलं आहे.
"वेळ आली आहे मागे हटण्याची..."
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत गीता म्हणाली, “प्रत्येक कलाकाराने एक वेळ येते तेव्हा थांबायला हवं. आता नवीन टॅलेंटला पुढे येऊ द्यायला हवं. मला वाटतं मी जे काही यश मिळवायचं होतं, ते मिळालं आहे.” तिने स्पष्ट केलं की, तिला आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचा नाही. पण जर एखादं प्रोजेक्ट अतिशय खास, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी वाटलं, तरच पुन्हा काम करण्याचा विचार करेल.
“आता इतरांची चमकण्याची वेळ आहे”
“सध्या कामाची टंचाई आहे. पूर्वीसारखे ८-१० गाण्यांचे सिनेमे बनत नाहीत. त्यामुळे असं वाटतं की आपण मागे हटून इतरांना संधी द्यायला हवी. आज जिथे आहे, तिथे मी समाधानी आहे,” असंही तिने म्हटलं.
बॉलिवूडमध्ये दमदार कारकिर्द
गीता कपूरने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फराह खानच्या ग्रुपमध्ये सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली. 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है', 'कभी खुशी कभी गम', 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने योगदान दिलं.
टीव्हीवर 'गीता माँ' म्हणून लोकप्रियता
बॉलिवूडमधील यशस्वी प्रवासानंतर गीता कपूरने डान्स रिअॅलिटी शोजमधून टीव्हीवर आपली ओळख निर्माण केली. 'Dance India Dance', 'Super Dancer' अशा कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून तिने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘गीता माँ’ हे नाव तीच्या व्यक्तिमत्वाशी घट्ट जोडलं गेलं.
गीता कपूरचा निर्णय, एक प्रगल्भतेचा आदर्श
गीता कपूरने घेतलेला हा निर्णय स्वतःच्या अनुभवातून आलेल्या परिपक्वतेचं प्रतीक आहे. स्वतःचं स्थान राखून इतरांना संधी देण्याची तिची भूमिका नक्कीच प्रेरणादायी आहे. बॉलिवूडमध्ये जरी तिचं प्रत्यक्ष योगदान संपलं असलं, तरीही ती लाखो चाहत्यांच्या हृदयात ‘गीता माँ’ म्हणून कायम राहील.


