Puja Banerjee - Kunal Verma Controversy: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांना चित्रपट निर्माते श्याम सुंदर डे यांनी अपहरण, डांबून ठेवणे आणि खंडणी वसूल करण्याचे आरोप केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि नेहमी चर्चेत असणारे कपल, पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा, यावेळी प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते श्याम सुंदर डे यांनी या दोघांवर अपहरण, डांबून ठेवणे आणि खंडणी वसूल करण्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. ही धक्कादायक घटना गोव्यात घडली असून, या प्रकरणामुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.

गोव्यातून सुट्टी थेट भयकथेत

श्याम सुंदर डे यांनी सांगितले की, ते गोव्यात आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी गेले होते. काही दिवसांनी कुटुंब घरी परतले आणि ते स्वतः काही व्यावसायिक कामासाठी तिथे थांबले. त्याचदरम्यान, एका काळ्या जॅग्वार कारने त्यांच्या गाडीला अडवलं. गाडीतून दोन अनोळखी व्यक्ती उतरले आणि त्यांना गाडीतून खाली उतरवले. श्याम म्हणाले की, ‘मी आधी नकार दिला, पण तिथे पूजा बॅनर्जीला पाहून मी थांबलो. ती माझ्यासाठी नेहमी बहिणीसारखी होती, त्यामुळे मला वाटले कदाचित काही गैरसमज झाला असेल.’

"व्हिलामध्ये डांबून ठेवले, मारहाण झाली"

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका मित्राच्या घरी आणि नंतर एका व्हिलामध्ये नेण्यात आले. तिथे 1 ते 4 जूनदरम्यान त्यांना जबरदस्तीने ठेवण्यात आले. या काळात कुणाल वर्माने त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला आणि पूजा बघ्याची भूमिका घेत राहिली. ‘मी दररोज त्यांना विनवण्या करत होतो, की आपण कुटुंबासारखे आहोत. पण त्यांनी मला फक्त धमक्या दिल्या,’ असे श्याम म्हणाले.

पत्नीचा आरोप, ‘खंडणी वसूल, ड्रग्ज प्रकरणाची धमकी’

श्याम यांच्या पत्नी मालबिका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकार उघड केला. त्यांनी आरोप केला की, श्याम यांना चार दिवस एकांत ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्यात आले, त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आली. या दबावाखाली श्याम यांनी 23 लाख रुपये ट्रान्सफर केले, असेही त्यांनी सांगितले.

मालबिकाच्या म्हणण्यानुसार, कोलकातामधील पूजाच्या असिस्टंटकडे रोख रक्कम दिली गेली, तर कुणालच्या खात्यात आरटीजीएस व्यवहार करण्यात आले. या सर्व व्यवहारांचे पुरावे बँक ट्रान्सफर, चॅट्स, ईमेल्स आणि पोलीस तक्रार यांच्यासह त्यांनी सादर केले आहेत.

"व्यावसायिक वाद वेगळा, पण अपहरण हा मार्ग नाही", श्याम यांचा खुलासा

श्याम म्हणतात, ‘हो, आमच्यात व्यावसायिक व्यवहार झाले होते. काही नुकसान झालं असेल, तर ते वेगळ्या मार्गाने सोडवायला हवं होतं. पण अपहरण करून आणि धमकी देऊन पैसे वसूल करणं हा योग्य मार्ग नाही.’

पूर्वी फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत होते पूजा-कुणाल

याआधी काहीच दिवसांपूर्वी पूजा आणि कुणाल यांनी आर्थिक फसवणुकीचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली आणि त्यांचे संपूर्ण बचत संपली. या प्रकरणात पुढे काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कायदा आपले काम करेल, पण अशा प्रकारच्या आरोपांनी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.