- Home
- Entertainment
- रजनीकांत यांच्या ''कूली''ने प्री-बुकिंगमध्येच कमावले 100 कोटी, वयाच्या 74 व्या वर्षी मोडले सर्व रेकॉर्ड
रजनीकांत यांच्या ''कूली''ने प्री-बुकिंगमध्येच कमावले 100 कोटी, वयाच्या 74 व्या वर्षी मोडले सर्व रेकॉर्ड
चेन्नई - सुपरस्टार रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड यांनी कूली चित्रपटाच्या प्री-बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने प्री-बुकिंगमधून १०० कोटी कमवले असून आज गुरुवारी चित्रपट रिलीज झाल्यावर आणखी वाढलेले खरे आकडे समोर येणार आहेत.

एन्ट्री नेहमीप्रमाणे धडाकेबाज
सुपरस्टार रजनीकांत पुन्हा परतले आहेत आणि त्यांची एन्ट्री नेहमीप्रमाणे धडाकेबाज आहे! ५० वर्षे चित्रपटसृष्टीत पूर्ण केल्यानंतर रजनीकांत आपल्या चाहत्यांना मोहित करण्यासाठी ‘कुली’ या चित्रपटासह परत येत आहेत. १४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात नागार्जुन अक्किनेनी, साउबिन शाहीर, आमिर खान, श्रुती हसन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरच्या ‘वॉर २’ सोबत थेट स्पर्धा करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सुमारास आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट एकमेकांशी भिडले आहेत, पण यावेळी ही स्पर्धा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानली जात आहे. सध्या तरी आगाऊ तिकीट विक्रीत ‘कुली’ने ‘वॉर २’वर मात केली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या तोंडी प्रसार (word of mouth) दोन्ही चित्रपटांच्या भारतातील आणि जागतिक कमाईसाठी निर्णायक ठरेल.
आगाऊ बुकिंगमधून सर्वात मोठी ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट
'कुली' चित्रपटासाठी अनिरुद्धने संगीत दिले आहे. सन पिक्चर्सने ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ने आगाऊ तिकीट विक्रीतून जगभरात तब्बल १०० कोटी रुपयांची (ग्रॉस) कमाई आधीच केली आहे, जी प्रचंड मोठी रक्कम आहे. यामुळे या चित्रपटाने रामचरणच्या ‘गेम चेंजर’चा विक्रम मोडला असून, जगभरातील आगाऊ बुकिंगमधून सर्वात मोठा ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे, असे Sacnilk च्या अहवालात म्हटले आहे. रामचरणच्या चित्रपटाने आगाऊ तिकीट विक्रीतून ८० कोटी रुपयांची कमाई केली होती.
विजयच्या ‘लिओ’चा विक्रम मोडणार
तामिळ चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, विजयच्या ‘लिओ’ने पहिल्याच दिवशी १४३ कोटींची कमाई केली होती. ‘कुली’ने आधीच १०० कोटी आगाऊ विक्रीतून जमा केले असून, १४ ऑगस्टच्या दिवशीचे अंतिम आकडे आणखी वाढू शकतात. त्यामुळे ‘कुली’ ‘लिओ’चा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडून सर्वाधिक कमाई करणारा तामिळ चित्रपट ठरू शकतो.
‘वॉर २’ची एवढ्या कोटींची कमाई
दुसरीकडे, ‘वॉर २’ने आगाऊ तिकीट विक्रीतून आतापर्यंत १६ कोटींची (ग्रॉस) कमाई केली असून, सध्या तो ‘कुली’च्या खूप मागे आहे. मात्र, स्पॉट बुकिंगमुळे चित्रपटाची गती वाढू शकते. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येथेही निर्णायक ठरतील. ज्युनिअर एनटीआरच्या लोकप्रियतेमुळे ‘वॉर २’ तेलुगू राज्यांत चांगली कमाई करू शकतो, पण तिथेही रजनीकांतचा ‘कुली’ मोठा प्रतिस्पर्धी ठरणार आहे.
उत्तर अमेरिकेत मोठी कमाई
'कुली' हा पहिला तमिळ चित्रपट आहे ज्याने उत्तर अमेरिकेत प्री-बुकिंगमध्ये विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे जगभरातूनच या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तमिळनाडूमध्ये तर गुरुवारी रात्रीच कुलीच्या आगमनाचे सेलिब्रेशन सुरु झाले होते.

