अभिनेत्री छाया कदम यांनी सिनेमाच्या सेटवर मराठी कलाकार आणि मराठी भाषेवरुन बोलणाऱ्या दिग्दर्शकाला चांगलेच झापल्याचा एक खास किस्सा सांगितला आहे. एवढेच नव्हे त्या दिग्दर्शकाला माफी देखील सर्वांसमोर मागायला लावली. 

मुंबई : सध्या राज्यात मराठी आणि हिंदी भाषेतील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावरून वादंग निर्माण झालं असून, विरोधक आणि अनेक कलाकार आपापली मतं व्यक्त करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आपला एक कटू अनुभव शेअर करत, मराठी कलाकार म्हणून आलेल्या भेदभावाची जाणीव करून दिली आहे.

"दिल्लीचा दिग्दर्शक म्हणतो…

कांस फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या छाया कदम यांनी सांगितले की, एका हिंदी सिनेमाच्या सेटवर त्यांना एका दिल्लीतील दिग्दर्शकाकडून वाईट अनुभव आला. त्या म्हणाल्या, “दिग्दर्शक दोन-तीन वेळा म्हणाला, ‘यार वो मराठी जैसा काम नहीं करने का’. मला हे ऐकून राग आला. माझ्यातली मालवणी आणि कबड्डी खेळणारी मुलगी जागी झाली.”

"माझं एकच उत्तर – मग का करतोस मराठी सिनेमा?"

छाया कदम पुढे म्हणाल्या, “माझं झालं की, जर तुला मराठी कलाकार आवडत नाहीत, तर मग तू मराठी सिनेमा का करत आहेस? हिंदीत तुला कोणी विचारलं नाही का म्हणून इकडे आला? त्याचं वागणं आणि बोलणं खटकत होतं.” त्यांनी स्पष्ट शब्दांत दिग्दर्शकाला विचारले – "हे काय बोलताय तुम्ही? आधी माफी मागा. मी वाद घालायला आलेली नाही, पण हे सहन करणार नाही."

"माझ्या ताकदीवर शूटिंग थांबवलं!"

छाया कदम म्हणाल्या, “मी आयुष्यात खूप माणसं कमावली आहेत. सेटवर स्पॉटबॉयपासून मेकअप आर्टिस्टपर्यंत सगळे माझे ओळखीचे. मी त्यांच्या ताई आहे. त्यामुळे जेव्हा मी म्हणाले ‘शूटिंग थांबवा’, तेव्हा ते थांबवलं गेलं. यानंतर दिग्दर्शकाने माफी मागितली आणि काम पुन्हा सुरू झालं.”

मराठी कलाकार म्हणून ठाम उभं राहणं महत्त्वाचं

मराठी कलाकार म्हणून हिंदी इंडस्ट्रीत अनुभवलेली भेदभावाची झलक छाया कदम यांनी उघडपणे सांगितली. त्यांच्या मते, कधी कधी आपल्याला ठामपणे बोलण्याची गरज असते आणि आपली ताकद दाखवून द्यावी लागते.

कामाबाबत बोलायचं झाल्यास…

छाया कदम यांच्या अभिनयाचं कौतुक ‘सैराट’ या सिनेमातील भूमिकेमुळे विशेष झालं. याशिवाय त्यांनी ‘न्यूड’, ‘लापता लेडिज’, ‘फॅण्ड्री’, ‘सिस्टर मिडनाइट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.