शुक्रवारी उशिरा, शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सुरुवातीच्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं. तिचा पती पराग त्यागी तिला तातडीनं रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मुंबई : ‘कांटा लगा’ या लोकप्रिय गाण्यामुळे घराघरात ओळख निर्माण केलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद परिस्थितीत झालं आहे. अवघ्या ४२ व्या वर्षी शेफालीने या जगाचा निरोप घेतला असून, तिच्या मृत्यूमागे नक्की काय कारण होतं यावर सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, तिच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिस साशंक असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे स्वयंपाकी, मोलकरणीसह कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.
शुक्रवारी उशिरा, शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सुरुवातीच्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं. तिचा पती पराग त्यागी तिला तातडीनं रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर, पहाटेपासूनच संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं.
संशयाची ठिणगी : फॉरेन्सिक टीम आणि पोलिस दाखल
रात्री उशिरा शेफालीच्या निधनाची बातमी समोर येताच काही तासांतच मुंबई पोलिस आणि फॉरेन्सिक टीम तिच्या अंधेरीतील राहत्या घरी पोहोचली. पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी घराची झडती घेतली आणि मृत्यूचे संभाव्य कारण शोधण्याचा तपास सुरू केला. हे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा खरंच हृदयविकाराचा झटका होता की आणखी काही?
काय म्हणाले पोलीस?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेफालीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू असून, काहीही निष्कर्ष लावण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा करावी लागेल.
घरातील लोकांची चौकशी सुरू
शेफालीच्या मृत्यूच्या वेळी घरी कोण होते? तिची तब्येत कशी बिघडली? त्या दिवशी काय घडलं? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिच्या घरात काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मोलकरीण यांनाही आंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
मृत्यूपूर्वीच्या क्षणांत नेमकं काय घडलं?
सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक विभाग मिळून संपूर्ण घटनाक्रम तपासत आहेत. घरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, शेफालीची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि तिच्या पतीचा जबाब या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केलं जात आहे.
शेफाली जरीवाला ही १५व्या वर्षीपासून मिर्गीच्या आजाराने त्रस्त होती, ही माहिती आधीपासून उपलब्ध आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि तिची आधीची वैद्यकीय स्थिती यांचा काही संबंध आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.
शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत ही बाब पूर्णतः गूढतेच्या छायेत आहे. बॉलिवूडमधील आणखी एका चमकत्या तारकाचा असा अचानक झालेला मृत्यू चाहत्यांना आणि मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारा आहे.


