बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींचा मुंबईत येण्याचा मूळ उद्देश ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. ऐनवेळी टायगर श्रॉफकडे बंदूक का वळवली, याचं खरं कारण आता उघड झालं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. खरंतर, हे शूटर्स टायगर श्रॉफला मारण्यासाठी मुंबईत आलेच नव्हते. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी हा धक्कादायक खुलासा केला आहे, असा रिपोर्ट एनडीटीव्हीने दिला आहे.
टायगर श्रॉफ रविवारी संध्याकाळी मुंबईच्या जुहू भागात फुटबॉल खेळून कारने घरी परतत होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी आता या प्रकरणी राजस्थानमधून तिघांना अटक केली आहे. हरियाणाचा फूल सिंग (१८), रहान (१८) आणि बिहारचा हृतिक ऊर्फ रोशन (२२) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटकेतील आरोपींचा मोठा खुलासा
पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली, तेव्हा खरी कहाणी बाहेर आली. हे तिघेही आरोपी एका दुसऱ्याच व्हीआयपीला (VIP) संपवण्यासाठी मुंबईत आले होते. तो व्हीआयपी जिथे जिथे जायचा, तिथे हे आरोपी पाळत ठेवून होते. पण, त्याच्यावर हल्ला करणं सोपं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. याच दरम्यान, टायगर श्रॉफच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेली एक रील त्यांच्या पाहण्यात आली. या अभिनेत्याला कोणतीही पोलीस सुरक्षा नाही, हे रीलमधून समजताच त्यांनी आपलं टार्गेट बदललं आणि टायगर श्रॉफवर निशाणा साधला, अशी माहिती पोलीस सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिली आहे.
बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्याचा प्लॅन
टायगर श्रॉफला संपवून संपूर्ण बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा या तिघांचा प्लॅन होता. अभिनेता कारमधून जात असताना त्यांनी तब्बल ७ वेळा गोळ्या झाडल्या. त्यांना आणखी गोळीबार करायचा होता, पण त्यांची बंदूक जॅम झाली. या हल्ल्यात टायगर आणि त्याचा ड्रायव्हर जखमी झाले आहेत. दोघांनीही मोठ्या शिताफीने शूटर्सच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि कारमधून पळ काढला.
या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी कुणाल, सुमती, राधा आणि बबिता यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कुणाल आणि सुमतीने शूटर्सना बंदुका मिळवून दिल्या होत्या. तर, अटक केलेल्या महिलांनी या बंदुका मुंबईतील दादरमध्ये आणून शूटर्सच्या हातात दिल्या होत्या, असं पोलिसांनी सांगितलं.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात
टायगर श्रॉफवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. अनिल पंडित नावाच्या एका व्यक्तीने आपण बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टायगर श्रॉफने अभिनेता सलमान खानसोबत काम केलं होतं, म्हणूनच आम्ही त्याच्यावर हल्ला केला. सलमान खानसोबत संबंध ठेवणाऱ्या चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला आम्ही संपवू, अशी धमकीही त्याने दिली आहे.
फक्त ५०,००० रुपये आणि परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून बिश्नोई गँगने या तीन तरुणांचा गुन्ह्यासाठी वापर केला, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. बिश्नोई गँगकडून त्यांना पक्का प्लॅन मिळाला होता. गोळीबार केल्यानंतर लगेचच शूटर्सनी गँगला माहिती दिली आणि त्यानंतर ते मुंबईतून पसार झाले, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.








