राजस्थानच्या कोटा पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे. या हल्ल्यासाठी आरोपींना अवघ्या ५० हजार रुपयांची ॲडव्हान्स सुपारी मिळाली होती. यात गँगस्टर अनिल पंडितचे नाव समोर आले आहे.

मुंबई : अज्ञात हल्लेखोरांनी काल मुंबईत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर तब्बल ७ राऊंड फायरिंग केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. कोटा पोलिसांनी सोमवारी राजस्थानमध्ये ट्रेनची झडती घेत तीन संशयितांना अटक केली. या आरोपींनी टायगरवर हल्ला करण्यासाठी किती सुपारी घेतली होती, याचा धक्कादायक खुलासा आता झाला आहे. वाचा सविस्तर बातमी.

पोलिसांनी काय सांगितलं?

प्राथमिक माहितीनुसार, मास्टरमाईंडने या तिघांना गुन्ह्यासाठी एकूण ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते. काम झाल्यावर मोठी रक्कम आणि परदेशात सेटल करण्याचं आश्वासन त्यांना मिळालं होतं. आता हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला, यात प्रत्येक आरोपीचा रोल काय होता आणि गोळीबारात वापरलेली शस्त्रे कुठे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

१५ मिनिटांत संपूर्ण ट्रेनची झडती!

कोटा पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण ट्रेनची झडती घेत तीन संशयितांना पकडलं. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या क्राईम डीसीपींनी सोमवारी सकाळी त्यांना एक टीप दिली होती. टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणारे तीन प्रमुख संशयित पुणे-जयपूर एक्स्प्रेसने प्रवास करत असून ते कोटा येथे पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच कोटा शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या १५ मिनिटांत ट्रेनची झडती घेतली आणि तिघांना अटक केली.

आरोपींचा प्लॅन काय होता?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही ट्रेन सकाळी साडेदहाच्या सुमारास कोटा जंक्शनवर पोहोचली. हे तिघेही जनरल डब्यातून प्रवास करत होते. ते आधी जयपूरला पोहोचणार होते आणि तिथून बसने दिल्लीला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता, असा तपास यंत्रणांचा संशय आहे. त्यानंतर ते नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मुंबई पोलीस या गोळीबार प्रकरणाचा मुख्य तपास करत असल्याने, पुढील तपासासाठी या तिघांनाही मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे तेजस्विनी गौतम यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत हे तीन संशयित?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे रेहान ऊर्फ सुक्का (रा. सोनीपत, हरियाणा) आणि हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन (मूळचा बेगुसराय, बिहार आणि सध्या मुंबई) अशी आहेत. यातील तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याची ओळख उघड केलेली नाही. पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, हृतिक हा रॅपिडो ड्रायव्हर आहे, तर इतर दोघे मजुरी करतात. या तीनपैकी दोन आरोपींवर आर्म्स ॲक्ट आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गोळीबारातील त्यांच्या भूमिकेबद्दलची सविस्तर माहिती चौकशीनंतरच समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

सुपारी किती दिली होती?

या प्रकरणात गँगस्टर अनिल पंडित याचं नावही समोर आलं आहे. सुरुवातीच्या तपासात अनिल पंडित हा रेहानच्या संपर्कात असल्याचं कोटा पोलिसांनी उघड केलं आहे. अनिलनेच रेहानला टायगर श्रॉफवर हल्ला करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा पोलिसांचा दावा आहे. तेजस्विनी गौतम यांच्या मते, मास्टरमाईंडने आरोपींना मोठी रक्कम आणि परदेशात सेटल करण्याचं आमिष दाखवलं होतं. या तिघांना मिळून एकूण ५० हजार रुपये ॲडव्हान्स मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आता हे पैसे कोणी दिले, हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.