अभिनेता सुनील शेट्टीच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त, त्याचा मित्र अजय देवगणने एक जुना फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिलवाले' सिनेमाची आठवण करून देणारी ही पोस्ट त्यांच्या घट्ट मैत्रीचं प्रतीक आहे.

बॉलिवूडचा 'अण्णा' अर्थात सुनील शेट्टीने मंगळवारी आपला ६५ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याचा जवळचा मित्र अजय देवगणने त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने त्यांच्या तरुणपणीचा एक जुना फोटो शेअर केला, ज्यामुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अजयने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक खास मेसेजही लिहिला. त्याने लिहिले, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @suniel.shetty अण्णा. एका दिलवाल्याकडून दुसऱ्या दिलवाल्याला." ही पोस्ट बॉलिवूडमधील या दोन जुन्या मित्रांच्या घट्ट नात्याची साक्ष देते. ९० च्या दशकापासून त्यांनी एकूण सहा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांचा पहिला सिनेमा 'दिलवाले' (१९९४) होता. त्यानंतर ते 'कयामत: सिटी अंडर थ्रेट' (२००३), 'एलओसी कारगिल' (२००३), 'टँगो चार्ली' (२००५), 'ब्लॅकमेल' (२००५) आणि 'कॅश' (२००७) यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र दिसले.

सुनील शेट्टीची कारकीर्द आणि आगामी प्रोजेक्ट्स

१९६१ मध्ये जन्मलेल्या सुनील शेट्टीने नव्वदच्या दशकात 'मोहरा', 'बॉर्डर' आणि 'हेरा फेरी' यांसारख्या सिनेमांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. तो त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखला जातो.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, सुनील शेट्टी नुकताच बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भेटण्यासाठी पाटण्याला गेला होता. तिथे त्याने एका सिनेमाच्या शूटिंगबद्दल चर्चा केली. या सिनेमाचं शूटिंग ऑक्टोबर २०२६ पासून सुमारे ५० ते ६० दिवस चालणार आहे. यासाठी पाटणा आणि सीतामढीमध्ये लोकेशन्स शोधली जात आहेत.

सुनीलने मीडियाला सांगितले, “आम्ही संपूर्ण विभागासोबत बैठक घेतली. आम्हाला इथे शूटिंगसाठी यायचं आहे. इथे नवीन फिल्म पॉलिसी लागू झाली आहे आणि बिहार शूटिंगसाठी एक मोठी जागा बनत आहे, त्यामुळे आम्ही सुमारे ५०-६० दिवसांच्या शूटिंगवर चर्चा करण्यासाठी आलो होतो.” तो शेवटचा 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात दिसला होता. आता तो 'हेरा फेरी ३' मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.