शहजाद पूनावाला कोण आहे? भाजपचे माजी प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक शहजाद पूनावाला यांनी 'राईज अँड फॉल सीझन २' जिंकला आहे. ३५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम त्यांनी पूरग्रस्तांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे.

राजकीय वर्तुळातील रोखठोक मतं आणि टीव्हीवरील वादविवादांसाठी ओळखले जाणारे शहजाद पूनावाला आता 'राईज अँड फॉल सीझन २' चे विजेते ठरले आहेत. प्रियांका चहर चौधरी आणि गौतम गुलाटी यांना मागे टाकत त्यांनी ही ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर आणि ३५ लाख रुपयांच्या बक्षीसानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शहजाद पूनावाला कोण आहेत?

शहजाद पूनावाला हे भारतीय राजकीय विश्लेषक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचं शालेय शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून राजकारण आणि प्रशासनाचं शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवीही पूर्ण केली आहे.

२००८ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पूनावाला यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण २०१७ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रक्रियेवर जोरदार टीका करत त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले.

'राईज अँड फॉल २' मधील शहजाद पूनावाला यांचा प्रवास

या शोमध्ये येण्यापूर्वीच शहजाद राजकीय डिबेट्स आणि टीव्ही शोमुळे प्रसिद्ध होते. पण शोमध्ये सिवेट तोमरसोबतचे खटके, प्रियांका आणि गौतमसोबतचे वाद आणि स्वरा भास्करसोबतच्या बदलत्या मैत्रीमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तेज प्रताप यादव यांच्यासोबतची त्यांची मैत्रीही चर्चेचा विषय ठरली. त्यांनी 'तिकीट टू फिनाले' टास्क जिंकला, ज्यामुळे त्यांची फायनलमधील जागा पक्की झाली होती.

View post on Instagram
 

३५ लाख रुपयांचं शहजाद पूनावाला काय करणार?

विशेष म्हणजे, शहजाद यांनी आपली संपूर्ण बक्षीस रक्कम पूरग्रस्तांसाठी दान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही रक्कम बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीला दिली जाणार आहे. या शोमध्ये प्रियांका चहर चौधरी दुसऱ्या तर गौतम गुलाटी तिसऱ्या स्थानावर राहिला.