अनोळखी नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सॲप कॉल्समुळे त्रासले आहात? आता एका सोप्या सेटिंगने तुम्ही हे कॉल्स सायलेंट करू शकता. यामुळे तुमचा फोन वाजणार नाही, पण कॉल तुमच्या लिस्टमध्ये दिसेल.

WhatsApp Trick : कामाच्या वेळी, झोपेत किंवा आपल्या पर्सनल टाइममध्ये अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स खूप त्रासदायक ठरू शकतात. पण प्रत्येक नंबरला ब्लॉक करणं नेहमीच शक्य नसतं, कारण कधीकधी तो नंबर एखाद्या डिलिव्हरी पर्सनचा, कंपनीचा किंवा दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी असू शकतो. यावर व्हॉट्सॲपने एक मस्त उपाय आणला आहे - 'Silence Unknown Callers' नावाचं फीचर. हे फीचर चालू केल्यावर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स सायलेंट होतात, म्हणजे तुमचा फोन वाजणार नाही. पण, तो कॉल तुमच्या 'Calls' टॅबमध्ये दिसेल, जेणेकरून तुम्ही तो नंतर तपासू शकता.

जेव्हा हे फीचर ॲक्टिव्हेट होतं, तेव्हा अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सॲप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स आपोआप म्यूट होतात. फोन वाजणार नाही, पण तुम्हाला कदाचित एक सायलेंट नोटिफिकेशन मिळेल आणि कॉल हिस्ट्रीमध्ये तो नंबर दिसेल.याचा अर्थ असा नाही की तो नंबर ब्लॉक झाला आहे. ती व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवू शकते. तुम्ही नंतर तो नंबर तपासून, महत्त्वाचा वाटल्यास सेव्ह करू शकता, कॉल बॅक करू शकता किंवा संशयास्पद वाटल्यास ब्लॉक करून रिपोर्ट करू शकता.

हे फीचर स्पॅम, फसवणूक आणि फालतू कॉल्सपासून वाचण्यासाठी खूप उपयोगी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा परिणाम तुमच्या फोनच्या नॉर्मल मोबाईल नेटवर्क कॉल्सवर होत नाही.

Android फोनवर हे फीचर कसे चालू कराल?

तुमच्या अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सॲप उघडा.

वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा.

Settings मध्ये जाऊन Privacy निवडा.

खाली स्क्रोल करून Calls वर टॅप करा.

Silence Unknown Callers पर्याय चालू (On) करा.

एकदा हे फीचर चालू झाल्यावर, तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स वाजणार नाहीत. तुम्हाला हे फीचर बंद करायचे असल्यास, याच मेन्यूमध्ये जाऊन ते कधीही बंद करू शकता.

iPhone वर हे फीचर कसे चालू कराल?

तुमच्या आयफोनवर व्हॉट्सॲप सुरू करा.

खालच्या उजव्या कोपऱ्यातील Settings वर टॅप करा.

Privacy पर्याय निवडा.

Calls सेक्शनमध्ये जा.

Silence Unknown Callers पर्याय ॲक्टिव्हेट करा.

जर तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसेल, तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून तुमचं व्हॉट्सॲप अपडेट करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

कॉल सायलेंट करणे म्हणजे नंबर ब्लॉक करणे नव्हे. अनोळखी व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवू शकते आणि त्यांचे आलेले कॉल्स तुमच्या लिस्टमध्ये दिसतील.

जर तुम्ही हॉस्पिटल, डिलिव्हरी सर्व्हिस, किंवा नोकरीसाठी मुलाखत अशा महत्त्वाच्या कॉल्सची वाट पाहत असाल, तर 'Calls' टॅब नियमितपणे तपासत राहा. महत्त्वाच्या व्यक्तीचा नंबर तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केल्यास त्यांचे कॉल्स सायलेंट होणार नाहीत.

अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून आलेल्या कॉलला खात्री केल्याशिवाय परत कॉल करू नका. जर कोणी OTP, UPI PIN, व्हेरिफिकेशन कोड मागत असेल किंवा तातडीने पैसे पाठवायला सांगत असेल, तर लगेच कॉल कट करा. संशयास्पद नंबर तुम्ही व्हॉट्सॲप प्रोफाइल किंवा कॉल डिटेल्समध्ये जाऊन ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकता.