प्रतिबंधित पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दिलेल्या नोटीसविरोधात अभिनेता अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उत्पादकांवर कारवाई न करता फक्त कलाकारांना नोटीस पाठवणं बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे.
मुंबई: प्रतिबंधित पान मसाल्याच्या जाहिरातीत काम केल्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफडीएने पाठवलेली 'कारणे दाखवा नोटीस' पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं अजय देवगणने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. जाहिरात बनवणाऱ्या कंपन्या किंवा उत्पादकांवर कोणतीही कारवाई न करता, फक्त जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारांना नोटीस पाठवणं चुकीचं असल्याचा दावा त्याने केला आहे.
राज्यात पान मसाल्यावर पूर्णपणे बंदी आहे. मात्र, 'विमल इलायची'च्या नावाखाली या प्रतिबंधित पान मसाल्याची सरोगेट जाहिरात (Surrogate advertising) केली जात असल्याचं एफडीएच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात फक्त अजय देवगणच नाही, तर शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या बड्या बॉलिवूड स्टार्सनाही एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रामध्ये तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा तसंच पान मसाल्याविरोधात एफडीएने सध्या जोरदार मोहीम उघडली आहे. याच कारवाईच्या कचाट्यात आता हे आघाडीचे कलाकार अडकले आहेत. प्रतिबंधित उत्पादनांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांवर पोलिसांच्या मदतीने थेट 'मोक्का' (MCOCA) लावण्याची तयारीही एफडीएने सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच, आता अजय देवगणने एफडीएच्या नोटीसला आव्हान देत कायदेशीर लढाई सुरू केली आहे.




