बंगळुरूच्या पीव्हीआर आयनॉक्समध्ये वापरलेले कप पुन्हा ग्राहकांना दिले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. आता पीव्हीआरने यावर स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळले आहेत. ते कप खराब होते आणि फेकून देण्यासाठी बाजूला ठेवले होते, असं कंपनीने म्हटलं आहे.
प्रिया व्हिलेज रोडशो (PVR) INOX ने गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील फोरम साऊथ मॉलमध्ये असलेल्या त्यांच्या मल्टिप्लेक्सबाबत एक स्पष्टीकरण दिलं आहे. तिथे वापरलेले कप पुन्हा ग्राहकांना दिले जात असल्याचा आरोप झाला होता.
बंगळुरूच्या कोननकुंटे भागातील फोरम मॉलमधील पीव्हीआर ज्यूस काउंटरवर हा प्रकार घडल्याचा आरोप एका ग्राहकाने केला होता. वापरलेले कप पुन्हा रचून ठेवल्याचा आणि त्यातच ग्राहकांना ज्यूस दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर कर्नाटकच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली.
कर्नाटक आरोग्य विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कोननकुंटे येथील फोरम साऊथ मॉलमध्ये अचानक तपासणी केली. तिथे त्यांना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळलं. अधिकाऱ्यांनी पीव्हीआरला नोटीस बजावली आणि ज्यूस काउंटर तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
'आम्ही कप पुन्हा वापरले नाहीत'
कर्नाटक आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर पीव्हीआर आयनॉक्सने एक अधिकृत पत्रक काढलं आणि हे सगळे आरोप फेटाळून लावले.
एशियानेट न्यूजएबलला दिलेल्या माहितीत पीव्हीआर आयनॉक्सने सांगितलं की, ते त्यांच्या सर्व मल्टिप्लेक्समध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे कप खराब आणि गळके होते. ते पुन्हा वापरण्यासाठी नाही, तर शिफ्ट संपल्यावर फेकून देण्यासाठी बाजूला ठेवले होते, असं कंपनीने स्पष्ट केलं.
"पीव्हीआर आयनॉक्स कच्चा माल आणि पॅकेजिंग हाताळताना स्वच्छता आणि गुणवत्तेचे कडक नियम पाळते," असं कंपनीने म्हटलं आहे.
"व्हिडिओमध्ये दिसणारे कप खराब झाले होते आणि त्यातून गळती होत होती. प्रक्रियेनुसार ते वेगळे काढून ठेवले होते. असे कप प्रत्येक शिफ्टच्या शेवटी अधिकृत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत फेकून दिले जातात आणि त्याची नोंद ठेवली जाते.
"आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही कपांचा पुन्हा वापर झालेला नाही आणि ते खराब कप ग्राहकांना ज्यूस देण्यासाठी वापरले नव्हते," असंही कंपनीने सांगितलं.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीव्हीआरने हा खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये एक ग्राहक ज्यूस काउंटरवरील कर्मचाऱ्यांना जाब विचारताना दिसत होता. वापरलेले ग्लास गोळा करून त्यातच पुन्हा प्रेक्षकांना ज्यूस दिला जात असल्याचा आरोप त्याने केला होता.
कर्नाटक आरोग्य विभागाच्या तपासणीवर पीव्हीआरचं म्हणणं
कर्नाटक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्सला भेट दिल्याच्या वृत्ताला पीव्हीआर आयनॉक्सने दुजोरा दिला. पण कामात कोणतीही हयगय झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. अंतर्गत तपासणीत कोणतीही चूक आढळली नसून, प्रशासनाच्या सर्व चौकशांना आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत, असं कंपनीने स्पष्ट केलं.
"संबंधित अधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्सला भेट देऊन नियमित तपासणी केली आहे आणि कंपनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे," असं कंपनीने सांगितलं.
"याशिवाय, कंपनीने केलेल्या अंतर्गत चौकशीत आणि ऑडिटमध्ये प्रक्रियेत कोणतीही चूक आढळलेली नाही.
"पीव्हीआर आयनॉक्स आपल्या सर्व ठिकाणी स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे सर्वोच्च निकष पाळण्यासाठी कटिबद्ध आहे," असं कंपनीने शेवटी म्हटलं.
दरम्यान, फोरम साऊथ बंगळुरूने याआधीच या घटनेबद्दल ग्राहकाची माफी मागितली होती. पीव्हीआरची टीम या प्रकरणाची चौकशी करत असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं.












