पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तो तिच्या कापलेल्या डोक्यासह संपूर्ण परिसरात फिरत होता. हत्येनंतर त्याने मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिचं कापलेलं डोकं हातात घेऊन तो चक्क संपूर्ण परिसरात फिरत होता. हा आरोपी कित्येक तास असाच फिरत राहिला आणि त्यानंतर तो एका मंदिरात गेला. तिथे त्याने हात जोडून दर्शनही घेतलं. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
पत्नीची हत्या करून मंदिरात घेतलं दर्शन
ही घटना गंगारामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील नारायणपूर भागात घडली. सीमा सरकार घोष असं मृत महिलेचं नाव असून, तिची हत्या करणाऱ्या तिच्या पतीचं नाव रिंटू घोष आहे.
'आज तक'ने दिलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, रिंटूने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. यानंतर जे घडलं ते आणखी भयंकर होतं. हत्येनंतर त्याने पत्नीचं कापलेलं डोकं हातात घेतलं आणि तो परिसरात फिरू लागला.
आरोपीला पत्नीचं डोकं घेऊन फिरताना पाहून स्थानिकांना मोठा धक्का बसला. काही वेळानंतर तो जवळच्या एका मंदिरात पोहोचला आणि तिथे त्याने हात जोडून प्रार्थना केली, असंही वृत्तात म्हटलं आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, आरोपीला अटक
या घटनेची माहिती मिळताच गंगारामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी सीमा यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि रिंटू घोषला अटक केली. हत्येसाठी वापरलेलं धारदार शस्त्रही गुन्ह्याच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलं आहे.
या हत्येमागचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय
प्राथमिक तपासात, कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या घटनेमागे आणखी काही कारणं आहेत का आणि या जोडप्यामध्ये आधीपासून काही वाद होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)




