Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपी अमर कदम याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. मात्र, हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुशांत जनार्दन दळवी असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह मुरे डोंगरी परिसरात आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला अटक केली आहे.

मुरे डोंगरी येथे सापडला मृतदेह

शुक्रवारी सकाळच्या सुमारास कणकवलीजवळील मुरे डोंगरी येथे सुशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह पोलीस आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुकादम अमर कदम अटकेत

या हत्येचा उलगडा अवघ्या काही तासांत करण्यात पोलिसांना यश आले. दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम यानेच गोळी झाडून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. कुडाळ-ओरस परिसरातून त्याला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघेही शिकारीसाठी गेले असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल

या प्रकरणाच्या तपासासाठी कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि जिल्हा गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. मृतदेह पुढील तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आला आहे.

हत्येमागील कारण अद्याप गूढ

या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत. यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, माजी आमदार वैभव नाईक यांनी पोलीस स्थानकात भेट देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.