उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये आयफोन चोरीची एक अजब घटना घडली आहे. इथं चोराने थेट फोन मालकाच्या बहिणीला मेसेज करून आयफोनचा पासवर्ड मागितला. १२ सप्टेंबरला क्लेमेंट टाऊनमधील घरातून फोन चोरीला गेल्याचा दावा कौशिकी ध्यानी हिने केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मेसेज देऊनही पोलिसांनी कारवाईस उशीर केल्याचा आरोप तिने केला आहे.

उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये आयफोन चोरीचं एक भन्नाट प्रकरण समोर आलं आहे. इथं चोराने चक्क मालकाच्या बहिणीला मेसेज करून फोनचा पासवर्ड मागितला आहे. क्लेमेंट टाऊन भागातील सनशाईन एन्क्लेव्हमध्ये १२ सप्टेंबरला एका घरातून हा फोन चोरीला गेला. आता मालकाची बहीण कौशिकी ध्यानी हिने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, चोराने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

घरातून आयफोन चोरीला

कौशिकीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ सक्षम १२ सप्टेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा आयफोन वापरत होता. पण पावणेनऊच्या सुमारास तो फोन रूममधून गायब झाला. त्यावेळी रूमचा दरवाजा उघडा होता. कुटुंबाने जेव्हा बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा दोन संशयित व्यक्ती रूमच्या दिशेने ये-जा करताना दिसल्या.

यानंतर १३ सप्टेंबरला भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली, असं कौशिकीने सांगितलं.

View post on Instagram
 

या प्रकरणात नवा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा एका अज्ञात व्यक्तीने कौशिकीच्या मोबाईलवर मेसेज करायला सुरुवात केली. तो चक्क चोरीला गेलेल्या आयफोनचा पासवर्ड मागत होता. त्या व्यक्तीने असे अनेक मेसेज केल्याचा दावा तिने केला असून, हे सगळे स्क्रीनशॉट्स आणि माहिती पोलिसांना देणार असल्याचं ती म्हणाली.

पोलिसांच्या कारवाईवर तरुणीचा सवाल

पासवर्ड मागणारा मेसेज आल्यावर आपण रात्री १० वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितलं, असा आरोप कौशिकीने केला आहे.

तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून पोलिसांना जाब विचारला आहे. कुटुंबाकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, संशयितांचे फोटो आहेत आणि चोराने केलेले मेसेजही आहेत, तरीही पोलीस कारवाई का करत नाहीत? असा सवाल तिने विचारला आहे.

चोराने थेट कुटुंबातील सदस्यालाच संपर्क केल्यामुळे, पोलिसांना या मेसेजमधून तपासासाठी मोठा धागा मिळू शकतो, असंही तिचं म्हणणं आहे.

युनिव्हर्सिटी परिसरातही चोरीच्या घटना

डीआयटी युनिव्हर्सिटी (DIT University) आणि ग्राफिक एरा युनिव्हर्सिटी (Graphic Era University) परिसरात झालेल्या इतर चोरीच्या घटनांमध्येही याच संशयित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचा दावा कौशिकीने केला आहे.

या भागातील अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि इतर वस्तू चोरीला गेल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात, या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि या घटनांचा क्लेमेंट टाऊन प्रकरणाशी संबंध आहे की नाही, हेही स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे एकत्र तपासावेत, अशी मागणी तिने केली आहे.

फोन ट्रेस करत असल्याचा पोलिसांचा दावा

या प्रकरणावर एसपी सिटी शेखर सुयाल यांनी सांगितलं की, संबंधित सर्कल ऑफिसरकडून (CO) या हरवलेल्या मोबाईलची माहिती घेण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रार दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच फोन ट्रेसिंगसाठी पोलीस पोर्टलवर रजिस्टर करण्यात आला आहे. अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, संबंधित सीओ या प्रकरणाचा अधिक तपास करतील.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, कौशिकीला मेसेज करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतपणे पटलेली नाही.